आमदाराची ‘गायकवाडी’ की वैचारिक दिवाळखोरी..? रिपाईचा पुण्यात एल्गार ; संजय गायकवाड आणि बागेश्वर बाबांचा काढला ‘पाचोळा’!

पुणे : ज्या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे बाळकडू पिऊन स्वाभिमानाची तलवार परजली, त्याच महाराष्ट्रात आज काही ‘नवनिर्मित शहाणे’ आणि ‘भोंदू’ महाराजांच्या इतिहासाची आणि लेखकांची विटंबना करायला निघाले आहेत. बुलढाण्याचे ते वादग्रस्त आमदार संजय गायकवाड—ज्यांनी सत्तेची ऊब अंगात शिरल्यामुळे की काय, पण भाषेचा आणि सभ्यतेचा सर्व बांध तोडून टाकला आहे—त्यांच्या मुजोरीला आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) ने थेट जिल्हाधिकारी दरबारी आव्हान दिले आहे!
तोंड की गटार?
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार गायकवाड यांनी ज्या खालच्या पातळीवर जाऊन आई-बहिणीवरून शिव्या घातल्या, ते ऐकून कोणत्याही सुसंस्कृत माणसाची मान शरमेने खाली जाईल. अहो आमदार महोदय, पुस्तक न वाचताच तुम्हाला एवढी ‘बुद्धी’ फुटली कुठून? ३७ वर्षांपासून ज्या पुस्तकाने लाखोंच्या डोळ्यातील पडदा दूर केला, त्या पुस्तकावर तुम्ही जिभ कापण्याच्या धमक्या देता? ही लोकशाही आहे की तुमची खासगी जहागीर? स्वतःला शिवभक्त म्हणवता आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान करता? याला ‘मर्दानगी’ म्हणत नाहीत, याला वैचारिक दिवाळखोरी म्हणतात!
भोंदूगिरीचा बाजार आणि बागेश्वरचा ‘ताळा’
एकीकडे हे आमदार आणि दुसरीकडे ते ‘बागेश्वर बाबा’! महाराजांबद्दल अगाध ज्ञान असल्याचा आव आणत या बाबांनी इतिहासाची जी मोडतोड केली आहे, ती पाहून सह्याद्रीचे कडेही संतापाने थरथरले असतील. चुकीचा इतिहास सांगून महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्या या मंडळींना वेसण घालणार कोण, हाच खरा प्रश्न आहे.
रिपाईचा इशारा : ‘राजीनामा द्या, अन्यथा…’
आज पुण्याचे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुड्डी साहेब यांना रिपाईच्या वतीने (सचिन खरात गट) मुख्य संघटक फिरोज मुल्ला (सर) यांच्या नेतृत्वाखाली एक जळजळीत निवेदन देण्यात आले. “आमदार संजय गायकवाड यांचा तात्काळ राजीनामा घ्या आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा,” अशी सिंहगर्जना मुल्ला सरांनी यावेळी केली. जर सरकारने या प्रकरणी डोळेझाक केली, तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राहुल वडमारे, संदीपभाऊ शेंडगे, संजय येडलेल्ल्लु यांच्यासह अनेक स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.
आता पाहायचे हे की, ‘लाख मेळो पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे’ म्हणणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात, लेखकांना धमक्या देणाऱ्या आणि महिलांचा अपमान करणाऱ्या या आमदारावर सरकार ‘मेहेरबानी’ दाखवते की ‘कारवाई’ करते!


























