इचलकरंजी आयजीएम रुग्णसेवेचा ‘इमर्जन्सी’ वॉर्डच आता ‘व्हेंटिलेटर’वर..!


इचलकरंजी आयजीएम रुग्णसेवेचा ‘इमर्जन्सी’ वॉर्डच आता ‘व्हेंटिलेटर’वर..!

इचलकरंजी/प्रतिनिधी:

आईच्या दुधाने आणि कष्टाच्या घामाने जगणाऱ्या या महाराष्ट्रात आज काय पाहायला मिळतंय? इचलकरंजीच्या ‘आयजीएम’ रुग्णालयाचा जो काही ‘खेळखंडोबा’ सध्या सुरू आहे, तो पाहून कुणाही स्वाभिमानी माणसाचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही! ज्या ठिकाणाहून माणसाला जीवदान मिळायला हवं, त्या रुग्णसेवेचा ‘इमर्जन्सी’ वॉर्डच आज स्वतः मृत्यूच्या दाढेत उभा असून तोच जणू ‘व्हेंटिलेटर’वर आहे की काय, असा जळजळीत प्रश्न आज इचलकरंजीची जनता विचारत आहे.

एका रात्रीत ठेकेदाराचे ‘काम बंद’चे अजब फर्मान सुटते आणि रुग्णालयाची संपूर्ण व्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून पडते. कुठला तो ठेकेदार आणि कसलं त्याचं ते मग्रूर वागणं! शेकडो कामगारांच्या हाताला काम देण्याऐजी त्यांच्या पदरात गोंधळाचं आणि निराशेचं दान पडलं आहे. ज्यांच्या रक्ताचं पाणी होऊन रुग्णालयाची चाकं फिरतात, त्या कामगारांचा दोन-दोन महिन्यांचा पगार थकवून त्यांना भुकेच्या खाईत लोटलं गेलंय. “पगार मिळाला नाही!” ही त्या कामगारांची आर्त डरकाळी प्रशासनाच्या दगडाच्या कानांपर्यंत पोहोचत का नाही? रिकामी पाकिटे आणि पोटाची आग घेऊन हा कामगार जेव्हा रस्त्यावर उतरेल, तेव्हा या खुर्चीवर बसलेल्या साहेबांना पळता भुई थोडी होईल, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. ही काळरात्र आता अधिक गडद होऊ लागली आहे.

रुग्णालयाची अवस्था तर अशी की, माणसाला आधार मिळण्याऐजी तिथे नरकयातनाच जास्त भोगाव्या लागत आहेत. अस्वच्छतेचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग आणि स्ट्रेचरवर केविलवाण्या अवस्थेत पडलेले रुग्ण… हे चित्र पाहून कोणत्याही संवेदनशील मनाला पाझर फुटेल, पण आमच्या प्रशासनाला याचं काहीच सोयरसुतक नाही. रुग्णांचे नातेवाईक मदतीसाठी वणवण फिरतायत, पण तिथे ना स्वच्छतेचा पत्ता, ना औषधांचा थांगपत्ता! हे रुग्णालय आहे की गरिबांच्या मरणाची टांकसाळ, असा संताप आता सर्वत्र व्यक्त होत आहे.

कडी म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांची ही भयानक ‘चूप’की! बाहेर समस्यांचा डोंगर उभा आहे, तक्रारींचे आलेख गगनाला भिडतायत, पण आमचे प्रशासक साहेब दोन्ही कानांवर हात ठेवून ढिम्म बसले आहेत. “समस्या वाढतायत, पण कुणीही बोलत नाही” हे चित्र म्हणजे व्यवस्थेला लागलेली एक प्रकारची कीडच आहे. ज्यांच्या हातात अधिकार आहेत ते मुके झालेत आणि ज्यांना ओरडून न्याय मागायचा आहे, त्यांना सत्तेच्या बळावर दाबून टाकलं जातंय.

आमचा सवाल आहे… हे असं किती दिवस चालणार? गरिबांच्या जीवाशी हा जो अघोरी खेळ सुरू आहे, तो त्वरित थांबला पाहिजे. आयजीएम रुग्णालयाची ही दुर्दशा म्हणजे इथल्या भ्रष्ट आणि नाकर्त्या व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली एक चपराक आहे. जागे व्हा साहेब, नाहीतर हीच पेटलेली जनता तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!