अभ्यासाचा असा काही ‘पेच’ टाकला की निकालाचा १००% निकालच लागला; सोनीच्या शाळेची ऐतिहासिक वारी..!
न्यू इंग्लिश स्कूल सोनी : सध्या सगळीकडे निकालाचा हंगाम सुरू आहे. कुणी पेढे वाटतंय, तर कुणी निकालाची पत्रिका पाहून गुपचूप कोपऱ्यात बसतंय. पण ‘न्यू इंग्लिश स्कूल, सोनी’ या विद्यालयाने मात्र यंदा चक्क १०० टक्क्यांचा डोंगर उभा केला आहे. वाघिणीचं दूध प्यायलेली ही ग्रामीण भागातील मुलं प्रतिकूल परिस्थितीवर अशी काही स्वार झाली की, निकालाचा निकालच लावून टाकला!
पुण्यातल्या पेठेत राहून आणि महागड्या शिकवण्या लावूनच मुलं हुशार होतात, असा ज्यांचा गोड समज आहे, त्यांच्या डोळ्यांत सोनीच्या या पोरांनी झणझणीत अंजन घातलं आहे. शाळेत नापास होण्यासाठी एखादा ‘नमुना’ शोधावा म्हटलं, तरी तो सापडणार नाही, अशी बिकट अवस्था या विद्यार्थ्यांनी निर्माण केली आहे.
या निकालाच्या शर्यतीत पोरींनी तर मुलांना असा काही ‘धोबीपछाड’ दिला आहे की, पहिल्या पाचमध्ये एकाही मुलाचा पत्ता नाही. कु. प्रांजली प्रशांत पाटील हिने ८६.६०% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर तिच्यापाठोपाठ सिफा येलूरकर (८४.६०%), मलिका मगदूम (८३.४०%), समीक्षा सूर्यवंशी (८१.००%) आणि तमन्ना मगदूम (७३.२०%) या रणरागिणींनी यशाचा गुलाल उधळला आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. मिलिंद जाधव सर, सचिव श्री. राहुल साळुंखे सर आणि मुख्याध्यापक श्री. बी. पी. पाटील सरांनी जेव्हा निकालाचा हा आकडा पाहिला असेल, तेव्हा त्यांना झालेला आनंद हा एखाद्या कवीला उत्तम कविता सुचल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षाही नक्कीच मोठा असावा. सोनी, धुळगाव, पाटगाव आणि करोली या चारही गावांतील ग्रामस्थांनी या यशासाठी जे सहकार्य केलं, त्याचं फळ आज पेढ्यांच्या रूपात संपूर्ण परिसरात वाटलं जातंय.
शेवटी इतकंच म्हणावसं वाटतं – मुलांनो, १०० टक्के निकाल लागला हे उत्तमच, पण आता पुढच्या आयुष्यात ‘शंभर टक्के’ यशस्वी व्हायचं असेल, तर पुस्तकांसोबत जगाचाही अभ्यास करा! सोनीच्या या गुणवंतांचे आचार्य अत्रेंच्या वतीने साष्टांग दंडवतपूर्वक अभिनंदन!



























