बेंबी सुटलेल्या नेत्यांना नानांचा ‘पॅडल’ सल्ला ; एसी गाड्या सोडा, आता सायकलवर कसरत करा..!


बेंबी सुटलेल्या नेत्यांना नानांचा ‘पॅडल’ सल्ला ; एसी गाड्या सोडा, आता सायकलवर कसरत करा..!

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी आज शंभरी पार करून सामान्यांच्या जगण्याचे खोबरे केले आहे. महागाईचा भस्मासूर घराघरात शिरला असताना, आमचे लोकप्रतिनिधी मात्र सरकारी खर्चाच्या इंधनावर आणि एसी गाड्यांच्या ताफ्यात बसून गरिबीवर प्रवचने झोडत आहेत. याच विसंगतीवर अभिनयाचे ‘नाना’ अर्थात नाना पाटेकर यांनी आपल्या खास शैलीत आसूड ओढला आहे. “नेत्यांनी सायकलवर फिरायला काय हरकत आहे?” या नानांच्या एका प्रश्नाने सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधकांच्याही तोंडचे पाणी पळवले आहे.

ज्या नेत्यांना साधे गाडीचे दार उघडायला दोन गडी लागतात, त्यांनी एकदा सायकलवर मांड ठोकून रस्त्यावर उतरून दाखवावेच. ज्यांची पोटे वाढून बेंब्या सुटल्या आहेत आणि ज्यांना साधे चालतानाही धाप लागते, अशा नेत्यांसाठी सायकल चालवणे हा केवळ इंधन बचतीचा उपाय नसून एक उत्तम व्यायामही ठरेल. भाषणात ‘गरिबी हटाव’च्या वल्गना करण्यापेक्षा एकदा भर उन्हात सायकलचे पॅडल मारताना जेव्हा कपाळाला घाम येईल, तेव्हाच या देशातील सामान्यांच्या घामाची आणि कष्टाची किंमत या नेत्यांना कळेल.

कल्पना करा, एखाद्या मंत्र्याचा ताफा सायकलवर निघाला आहे आणि मध्येच साखळी निसटल्यामुळे नामदार खाली उतरून हात काळे करत बसले आहेत! हे दृश्य पाहायला मिळावे हीच आजच्या त्रस्त जनतेची मोठी करमणूक ठरेल. नियम आणि शिस्तीचे डोस फक्त जनतेला पाजण्यापेक्षा, नेत्यांनी स्वतः सायकलवर स्वार होऊन साधेपणाचा आदर्श घालून द्यावा. तसेही, एसीच्या काचांमागून फिरणाऱ्या नेत्यांना बाहेरची ‘गरम हवा’ कळणार तरी कशी? त्यामुळे आता नेत्यांनी गाड्यांचे मोह सोडावेत आणि सायकलचे हँडल हाती धरावे, तरच या देशाला खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येतील, नाहीतर इंधनाचे दर सामान्यांचे कंबरडे मोडायला टपलेलेच आहेत!



48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!