# देहरंग धरणातील मातीचा ‘मसाला’: तहसीलदारांचा तोफगोळा की केवळ दिवाळीचा लवंगी फटाका

सुनील पाटील :
पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे गाळ आणि माती उत्खनन करण्याचे काम सुरू होते. या बेकायदेशीर वाहतुकीमुळे स्थानिक आदिवासी नागरिकांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणी ‘ग्रामविकास संघर्ष समिती’चे गणपत वारगडा यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.
नागरिकांचा वाढता रोष आणि विविध वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर, देहरंग धरणातील बेकायदेशीर माती उत्खननाचे काम प्रशासनाकडून तात्काळ थांबवण्यात आले. उत्खनन थांबले असले तरी, वीटभट्ट्यांसाठी बेकायदेशीरपणे करून ठेवलेल्या मातीच्या साठ्यांवर महसूल विभागाने अद्याप कोणतीही दंडात्मक किंवा जप्तीची कारवाई केलेली नाही.
तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी बेकायदेशीर माती साठा करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळेच ही कारवाई टाळली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
प्रशासकीय बाजू:
या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. तर दुसरीकडे, संबंधित महसूल अधिकारी वल्लभ मसके यांच्याशी संपर्क साधला असता, **”सदर प्रकरणात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल,”** अशी माहिती त्यांनी दिली.
धरणाचे पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या या अवैध माती साठा करणाऱ्यांवर प्रशासन कधी आणि काय कारवाई करणार, याकडे आता पनवेलमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#PanvelNews #DehrangDam #RevenueDepartment #IllegalMining #Encroachment #PanvelMunicipalCorporation #PressMediaLive #SocialJustice #AdministrativeFailure #Awareness #MaharashtraNews #NaviMumbaiNews

























