FDA चा बनावट अधिकारी बनून मेडिकल चालकाला लुटण्याचा प्रयत्न; सतर्कतेमुळे तोतया पोलिसांच्या जाळ्यात!


FDA चा बनावट अधिकारी बनून मेडिकल चालकाला लुटण्याचा प्रयत्न; सतर्कतेमुळे तोतया पोलिसांच्या जाळ्यात!

राजगुरुनगर (खेड): स्वतःला अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) वरिष्ठ निरीक्षक असल्याचे भासवून मेडिकल स्टोअरमध्ये खंडणी उकळणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मेडिकल चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने या भामट्याचा पर्दाफाश झाला असून, आनंद गौतम भुजंग (वय ३४, रा. सांगवी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर येथील ‘भवानी मेडिकल’ मध्ये आरोपी आनंद भुजंग हा गुरुवारी अचानक दाखल झाला. आपण अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून त्याने दुकानाची तपासणी सुरू केली. त्याने औषधांचा साठा, विक्रीच्या नोंदी आणि इतर तांत्रिक कागदपत्रांची झाडाझडती घेण्याचे नाटक केले.

तपासणी दरम्यान, दुकानात गंभीर दोष असल्याचे सांगून त्याने दुकानदार तरुण चौधरी यांच्यावर कारवाईची भीती घातली. ही कारवाई टाळण्यासाठी त्याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

दुकानदाराची सतर्कता पडली भारी

आरोपीच्या बोलण्यातील विसंगती आणि वागण्यावरून चौधरी यांना संशय आला. त्यांनी तातडीने ओळखपत्राची मागणी केली. ओळखपत्रावर ‘आकाश कोंडुसकर’ असे नाव होते, मात्र ते संशयास्पद वाटल्याने चौधरी यांनी तत्काळ एफडीए (FDA) कार्यालयाशी संपर्क साधून खात्री केली. विभागात अशा नावाचा कोणताही अधिकारी नसल्याचे समजताच चौधरी यांनी स्थानिक खेड पोलिसांना पाचारण केले.

आरोपीचे खोटे नाव आणि पोलिसांची कारवाई

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला ‘आकाश कोंडुसकर’ सांगणाऱ्या या आरोपीचे खरे नाव आनंद गौतम भुजंग असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त केले असून, त्याच्यावर फसवणुकीचा आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचे आवाहन: “शासकीय अधिकारी असल्याचे सांगून कोणी पैशांची मागणी करत असेल, तर व्यावसायिकांनी घाबरून न जाता त्यांचे ओळखपत्र तपासावे आणि त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. राजगुरुनगरमधील मेडिकल चालकाने दाखवलेली सतर्कता कौतुकास्पद आहे.”

या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. या आरोपीने जिल्ह्यात आणखी कोणाला अशा प्रकारे लुटले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!