पुणे :- दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंता तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकी भागात छापे टाकले होते. या प्रकरणाचा तपासात मिळालेल्या माहितीनुसार कोंढव्यात वास्तव्यास संगणक अभियंता तरुणाला अटक करण्यात आली. एटीएसच्या कारवाईनंतर तो चेन्नईला गेला होता. चेन्नईहून पुणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
झुबेर हंगरगेकर (वय ३२, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़झुबेर मूळचा सोलापूरचा असून, तो उच्चशिक्षित आहे. तो माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एटीएसने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकीसह शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई केली होती. याप्रकरणात १८ जणांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून १९ लॅपटॉप, मोबाइल, तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. लॅपटॉपमधील माहितीचे विश्लेषण करण्यात आले. जुबेर हा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. झुबेर हा चेन्नईला गेला होता. चेन्नईहून परतताच त्याला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
वाहनचोरीचा प्रयत्न करत असताना कोथरुड पोलिसांनी चौघांना २०२३ मध्ये पकडले होते. कोंढव्यातील त्यांच्या घराची झडती घेतल्यावर त्यात अनेक कागदपत्रे, लॅपटॉपमध्ये देशात बॉम्बस्फोट करण्याचा कट रचल्याचे आढळून आले होते़ कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील जंगलात त्यांनी बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. पुण्यातील कोंढवा भागात त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघडकीस आले होते. दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील एका कपड्याच्या दुकानात दरोडा टाकून त्यातील पैशांमधून बॉम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले होते.
कोंढव्यात त्यांनी बॉम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बॉम्बस्फोट केले होते. त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर एनआयएच्या पथकाने कोंढव्यातील मिठानगर परिसरातील इमारत जप्त केली. दहशतवादी महाराष्ट्रात आयसीएसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करून तरुणांची माथी भडकावत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यांनी पुणे, मुंबईसह गुजरातमधील मोठ्या शहरात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
झुबेर हंगरगेकरला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. झुबेर याच्या संगणकातून काही माहिती मिळाली आहे, तसेच त्याच्या घरातून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. तो अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो अल कायद्याच्या संपर्कात कसा आला ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याची विनंती विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने त्याला चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला आहे.





























