शिरढोण ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगासह कर वसुलीत मोठा भ्रष्टाचार? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
शिरढोण (प्रतिनिधी) :
शिरढोण ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाचा निधी, घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिरढोण येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना देण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मुद्दे आणि आरोप:
ग्रामस्थांनी १ एप्रिल २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२५ या काळातील कारभारावर बोट ठेवले आहे. निवेदनात प्रामुख्याने खालील आरोप करण्यात आले आहेत:
बोगस बिले आणि साहित्य खरेदी: समाज मंदिर दुरुस्ती, डस्टबिन खरेदी, आर.ओ. सिस्टीम आणि नळ पाणीपुरवठा साहित्य प्रत्यक्षात खरेदी न करताच त्याची बिले अदा करण्यात आली आहेत.
निकृष्ट कामे :
अंदाजपत्रकाप्रमाणे कामे न करणे, कामाचे तांत्रिक मूल्यांकन न घेणे आणि अत्यंत दर्जाहीन कामे करणे. वसुलीत अनियमितता: ग्रामस्थांकडून कर वसुली करूनही त्यांना रीतसर पावत्या न देणे आणि मासिक सभेत अवाढव्य खर्चाला मंजुरी मिळवणे.नियमबाह्य व्यवहार: नियमापेक्षा जास्त रकमेचे व्यवहार रोखीने करणे आणि मोटार दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार जादा बिले काढणे.
नेत्यांचे नियंत्रण सुटले? गावाची ‘सुकानू हरवलेली नाव’ अशी अवस्था
निवेदनासोबतच गावातील राजकीय परिस्थितीवरही मोठी चर्चा रंगली आहे. शिरढोण गावाची अवस्था ‘सुकानू हरवलेली नाव’ अशी झाली असून, निवडणुकांपुरते एकत्र येणारे नेते नंतर ग्रामपंचायत कारभाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
विशेष निरीक्षण: गावातील नेत्यांचे सदस्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, निवडून आलेल्या महिला सदस्यांना त्यांचे ‘पतीदेव’ कारभारात हस्तक्षेप करू देत नाहीत, ज्यामुळे महिला सदस्यांची मोठी कोंडी झाली आहे. कोण सदस्य कोणत्या पक्षाचा आहे, हे ओळखणेही आता कठीण झाले आहे.
आंदोलनाचा इशारा
या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सह-पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
निवेदनावर माजी पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, माजी उपसरपंच पोपट पुजारी, प्रा. चंद्रकांत मोरे, विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे, अशोक मगदूम, बाबुराव मुंगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो ओळ: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना निवेदन देताना अविनाश पाटील, पोपट पुजारी, चंद्रकांत मोरे, सुरेश सासणे, विश्वास बालीघाटे व अन्य ग्रामस्थ.





























