शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! मुंबई आणि पालघरमधील दोन खाजगी शाळांची मान्यता रद्द
पुणे : खाजगी शाळांच्या मनमानी कारभाराला आता शिक्षण विभागाने चाप लावला आहे. विद्यार्थ्यांचे हित जपण्यात आणि शासकीय नियम पाळण्यात अपयशी ठरल्याबद्दल शिक्षण विभागाने मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील दोन खासगी शाळांची मान्यता तातडीने रद्द केली आहे. या धडक कारवाईमुळे राज्यभरातील संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यभरात खासगी शाळांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अनेक ठिकाणी शाळांचे संस्थाचालक आणि प्रशासन मनमानी पद्धतीने फी वाढ आणि इतर नियम लादत असल्याने पालक आणि विद्यार्थी त्रस्त झाले होते. या तक्रारींची दखल घेत शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.
कोणत्या शाळांवर झाली कारवाई..?
शिक्षण विभागाने ज्या दोन शाळांची मान्यता रद्द केली आहे, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
श्रीमती मनरादेवी एज्युकेशन संस्था, आझादवाडी, दामू नगर, कांदिवली पूर्व, मुंबई (इंग्रजी माध्यम)
हनुमंत विद्यामंदिर शाळा, कावरपाडा सातीवली पूर्व केंद्र, वालीव, तालुका वसई, जिल्हा पालघर (हिंदी माध्यम)
काय आहेत प्रमुख कारणे..?
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ आणि महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्रगती नियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईमागील प्रमुख ठपके पुढीलप्रमाणे आहेत:
मानके आणि प्रमाणके पूर्ण करण्यात अपयश: ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम’ मध्ये विहित केलेली आवश्यक मानके आणि प्रमाणके शाळा पूर्ण करत नव्हत्या.
विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा: शाळा प्रशासनाच्या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा पोहोचत असल्याचे निदर्शनास आले. शासकीय समित्यांची स्थापना नाही: शासनाच्या नियमानुसार शाळेत सखी सावित्री समिती आणि माता पालक समिती स्थापन करण्यात आली नव्हती.
या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे पालक वर्गाने समाधान व्यक्त केले असून, खासगी शाळांच्या मनमानीला लगाम बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाने यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर अशीच कठोर कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



























