पांढरपेशी राजकारण्यांचा काळा धंदा..! ‘फरारी’ गुन्हेगारालाही लुटणारे हे कसले लोकप्रतिनिधी?


पांढरपेशी राजकारण्यांचा काळा धंदा..! ‘फरारी’ गुन्हेगारालाही लुटणारे हे कसले लोकप्रतिनिधी?

 

पुणे : पुण्याच्या राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्रातील साटलोटं आज पुन्हा एकदा रक्ताने माखलेल्या सुसाईड नोटमुळे चव्हाट्यावर आलं आहे! हडपसरचा कुख्यात गुंड टिपू पठाण याच्या टोळीवर ‘मकोका’ लागला आणि टोळीचा हस्तक सादिक हुसेन कपूर पोलिसांच्या भीतीने फरार झाला. पण त्याला पोलिसांच्या खाकी वर्दीपेक्षाही जास्त भीती वाटली ती खादीतील ‘पांढरपेशी’ डॅकूंची! अखेर या छळाला कंटाळून सादिकने लष्कर परिसरातील कुमार पॅलेसमध्ये मृत्यूला कवटाळलं.

५ पानांचे ‘मृत्यूपत्र’: माजी नगरसेवकाचा भीषण चेहरा..!

सादिक कपूरने आत्महत्या करण्यापूर्वी केवळ चिठ्ठीच लिहिली नाही, तर तब्बल ३० ते ३५ पानांचे एक ‘मृत्यूपत्र’ लिहून ठेवले होते. पोलिसांनी जप्त केलेल्या या दस्तऐवजात सादिकने आपल्या छळाची इंत्यभूत माहिती लिहून ठेवली आहे. “माजी नगरसेवकाने माझ्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती,” असा खळबळजनक खुलासा या चिठ्ठीतून झाला आहे. मकोका लागलेला एक गुन्हेगार जीवाच्या आकांताने पळत असताना, हे ‘माननीय’ नेते वसुलीसाठी त्याच्या मागे हात धुवून लागले होते.

मुलाने फोडला वाचा : “वडिलांच्या मृत्यूला हेच जबाबदार”

सादिक कपूरचा मुलगा साजिद कपूर याने लष्कर पोलीस ठाण्यात दिलेली फिर्याद काळजाचा थरकाप उडवणारी आहे. “नगरसेवक, त्याचा मुलगा आणि त्यांच्या साथीदारांच्या सततच्या त्रासामुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली,” असा थेट आरोप साजिदने केला आहे. ५० लाखांच्या खंडणीसाठी सादिकला मानसिकदृष्ट्या इतके खच्ची करण्यात आले की, पोलिसांना शरण जाण्यापेक्षा मृत्यूला जवळ करणे त्याने पसंत केले.

आरोपींची फौज आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक फारूक यासीन इनामदार, त्यांचा मुलगा अफान इनामदार, जहूर सय्यद आणि तन्वीर मनियार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातील वादातून आणि ५० लाखांच्या खंडणीच्या हव्यातून हा बळी गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

“पुण्याच्या राजकारणात आता फक्त गुन्हेगारांचे उदात्तीकरण उरले नसून, राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण ही कर्करोगासारखी पसरणारी व्याधी झाली आहे. ३५ पानांचे पत्र लिहून एक माणूस जीव देतो, तेव्हा त्या पत्रातील प्रत्येक शब्द या लोकप्रतिनिधींच्या भ्रष्ट व्यवस्थेवर ओढलेला आसूड असतो! चोराच्या घरी दरोडा टाकणारे हे नव-संस्कृतीचे ‘भाई’ आता कायद्याच्या कचाट्यातून कसे सुटतात, की त्यांना सत्ताधाऱ्यांचे अभय मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!”

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!