बुवा, बाया आणि खादी: कलियुगातील नवा ‘त्रिकोण’!


बुवा, बाया आणि खादी: कलियुगातील नवा ‘त्रिकोण’!

— विशेष संपादकीय 

  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. पण सध्या आपल्या या मातीत ज्या पद्धतीने ‘भोंदू बुवा’ आणि त्यांच्या चरणी लोळण घेणारे ‘खादीधारी’ नमुने उदयाला येत आहेत, ते पाहून प्रत्यक्ष वैकुंठवासी तुकोबांनीही कपाळाला हात लावून घेतला असता! अध्यात्माचा बाजार मांडणाऱ्या या भोंदूगिरीवर आणि त्यात सामील झालेल्या राजकारण्यांवर भाष्य करणे आता अनिवार्य झाले आहे.

जुन्या म्हणीचे ‘कलियुगी’ अपडेट !

एकेकाळी आपल्या समाजात एक जुनी म्हण प्रचलित होती— ‘बुवा तेथे बाया!’ जिथे कोण्या बुवाचा मठ असायचा, तिथे श्रद्धेपोटी माता-भगिनींची गर्दी असायची. ही म्हण समाजातील एका विशिष्ट ओढीपुरती मर्यादित होती. पण आजच्या या कलियुगात ही जुनी म्हण आता कालबाह्य झाली असून, एक नवी आणि चपखल म्हण उदयाला आली आहे. ती म्हणजे— ‘बुवा तेथे बाया आणि खादी!’ आता केवळ भोळ्या-भाबड्या स्त्रियाच नाही, तर पांढरशुभ्र खादीधारी नेतेही या बुवांच्या दरबारात तितक्याच ‘अध्यात्मिक’ लाचारीने उभे राहिलेले दिसतात. ज्या खादीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, तीच खादी आज बुवांच्या चरणी नतमस्तक होऊन “महाराज, यंदा पाकीट गरम होईल ना? तिकीट मिळेल ना?” असे विचारताना पाहून हसावे की रडावे, हेच समजेनासे झाले आहे!

राजकारणात बुवाबाजी नकोच !

खरे तर, राजकारणात ही बुवाबाजी असणे अजिबात बरोबर नाही! राजकारण हे समाजसेवेचे आणि धोरणांचे शास्त्र आहे, ते काही मंत्र-तंत्राचे दुकान नाही. ज्या नेत्यांनी विज्ञानाची कास धरून जनतेचे प्रश्न सोडवायला हवेत, तेच नेते जेव्हा बुवांच्या अंगारा-धुपाऱ्यावर विसंबून राहतात, तेव्हा ती लोकशाहीची थट्टा ठरते. राजसत्तेने जेव्हा जेव्हा अशा भोंदूगिरीला प्रतिष्ठा दिली आहे, तेव्हा तेव्हा समाजाचे अध:पतन झाले आहे. लोकशाहीत ‘लोक’ महत्त्वाचे असतात, ‘बुवा’ नव्हे! नेत्यांनी आपली निष्ठा संविधानावर ठेवायला हवी, कोण्या बुवाच्या वचनावर नाही.

नेत्यांची लाचारी आणि ‘जनतेचा’ कौल

निवडणुका जवळ आल्या की, हे नेते अचानक ‘धार्मिक’ होतात. ज्या नेत्यांनी विधानसभेत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवायला हवा, ते बुवांच्या पायावर डोके टेकवून बसलेले असतात. नेत्यांना वाटते की बुवांच्या पाठीशी असलेली ही ‘व्होट बँक’ आपल्या पदरात पडेल. पण खरं तर, ही नेत्यांची शुद्ध लाचारी आहे. ज्या ‘जनतेने’ त्यांना निवडून दिले, त्या जनतेच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्याऐवजी, हे नेते बुवांच्या आशीर्वादावर जास्त विसंबून आहेत, हा मोठा विरोधाभास आहे!

जनतेचा उडत चाललेला विश्वास !

पण एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे— आजची ‘जनता’ आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. असले ढोंगी बुवा, त्यांचे अचरट चमत्कार आणि त्यांचे किळसवाणे उद्योग पाहून आता सामान्य जनतेचा बुवाबाजीवरचा विश्वास पूर्णपणे उडू लागला आहे! लोक आता शहाणे होत आहेत. “जो स्वतःचे नशीब बदलू शकत नाही, तो आमचे काय भविष्य बदलणार?” हा टोकदार प्रश्न आता गल्लीबोळातली जनता विचारू लागली आहे.

आज समाजात बुवांचे पीक फोफावले आहे आणि त्याला राजकारण्यांच्या खताची साथ मिळतेय. अशा वेळी जनतेनेच आता पुढाकार घेऊन हे ओळखायला हवे की, आपला उद्धार हा स्वतःच्या कर्मात आणि विचारात आहे. नेत्यांनीही लक्षात ठेवावे की, तुमचा खरा ‘बुवा’ हा तुमचा मतदार आहे! जर राजकारणातून ही बुवाबाजी हद्दपार झाली, तरच खऱ्या अर्थाने सुराज्य येईल.


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!