पुणे महापालिकेच्या अंतिम मतदार यादीत पुन्हा गोंधळ ! मतदारांची नावे मोठ्या संख्येने इतर प्रभागांमध्ये !
पुणे महापालिकेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादी नंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोठ्या संख्येने मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागांमध्ये हस्तांतरित झाली असल्याचे दिसून आले आहे.
महापालिकेने यापूर्वी प्रारूप मतदारयादी जाहीर केल्यानंतरही मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मोठ्या प्रमाणात बदली झाली होती, ज्यामुळे मतदारांसह राजकीय पक्षांमध्येही चांगलाच गोंधळ उडाला होता.
हरकतींचा पाऊस, तरीही गोंधळ कायम
नागरिकांच्या तक्रारी: प्रारूप यादीतील गोंधळामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट निवडणूक आयोगाकडे तब्बल २२ हजार ८०९ इतक्या तक्रारी (आक्षेप) नोंदवल्या होत्या. प्रशासनाच्या हरकती: याशिवाय, निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने देखील स्वतःहून ४५ हजार ४०३ इतक्या हरकती घेतल्या होत्या.
स्वीकृत/अमान्य: या एकूण हरकतीं पैकी १८ हजार १५० हरकती महापालिकेने अमान्य केल्या, तर ४७ हजार ७३ इतक्या हरकती मान्य केल्या होत्या.
मतदार आणि मोठी प्रभाग संख्या
महापालिकेच्या एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ मतदारांपैकी तब्बल ३ लाख ४४६ मतदार दुबार (Duplicate) असल्याचे यापूर्वी उघड झाले होते.
महापालिकेच्या एकूण ४१ प्रभागांपैकी १० प्रभागांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त मतदारसंख्या आहे. याआधी प्रारूप मतदारयादीमध्ये दुबार नावे, अन्य प्रभागात नावे जाणे, यांसारखा गोंधळ मोठ्या प्रमाणात उडाला होता आणि आता अंतिम यादीनंतरही हा गोंधळ पूर्णपणे दूर झालेला नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाच्या दिवशी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





























