कोंढव्यात दादांचा फोटो ‘बेपत्ता’; हा राजकीय मुजरा की मतदारांपुढे लाचारीचा मुजरा?
पुणे: कसं काय मंडळी? पुण्याच्या राजकारणात सध्या काय ‘कावा’ चाललाय पाहिलंत का? निष्ठा कशी गहाण ठेवली जाते आणि मतांच्या एका थेंबासाठी आपलेच नेते कसे ‘अदृश्य’ केले जातात, याचा एक नमुना कोंढवा-कौसरबागच्या (वॉर्ड १९) गल्लीत पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) शूरवीरांनी आपल्याच नेत्याचा फोटो प्रचाराच्या कार्यालयातून असा काही गायब केलाय की, जणू दादा कधी तिथे होतेच नव्हते!
नेत्याचा चेहरा की भीतीचा पहारा.?
घडलंय असं की, निवडणूक आली की या मंडळींना जनतेची आठवण येते. सुरुवातीला कार्यालयावर अजितदादांचा फोटो दिमाखात लागला होता. पण जसा जसा प्रचाराचा धूर मुस्लीम बहुल वॉर्डात शिरला, तशी या कार्यकर्त्यांची पळता भुई थोडी झाली! दादा तर भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेत, मग इथल्या मतदारांना तोंड कसं दाखवायचं? या भीतीने दादांच्या फोटोवर चक्क ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला!
हा कसला ‘राजकीय व्यभिचार’?
अहो, ज्या नेत्याच्या जिवावर सत्तेची मलई चाखताय, ज्यांच्या नावावर छाती ठोकून पदे भोगताय, त्याच नेत्याचा चेहरा मतदारांना दाखवायला तुमची जीभ का कतरतेय?
मंचावर: “आम्हीच दादांचे वाघ!”
मैदानात: “दादांचा फोटो दिसला तर मतं जातील!”
आणि मनात: “तत्त्वं गेली चुलीत, आम्हाला फक्त खुर्ची द्या!”
हे म्हणजे कसं झालं माहितीये? “हवंय दादांचं नाव, पण मुस्लीम वॉर्डात मात्र त्यांचाच ‘गेम’ करून आपला बचाव!” हा कसला पुरुषार्थ आणि हे कसले निष्ठावंत? सत्तेत असताना दादांचे पाय धरायचे आणि मते मागताना मात्र दादांनाच अडगळीत टाकायचे!
जनतेचा थेट सवाल!
कोंढव्याची जनता काही दुधखुळी नाही. लोक आता विचारतायत— “ज्या पक्षाला स्वतःच्या नेत्याचा फोटो लावायची भीती वाटते, तो पक्ष उद्या आमची बाजू घ्यायला घाबरेल की नाही?” अजित दादा म्हणतात, “साहेब आणि मी वेगळे नाही.” मग कार्यकर्त्यांनो, फोटो काढताना तुमचे हात थरथरले नाहीत का? हा फोटो बदलण्याचा खेळ नाही, तर हा तुमच्या ‘लाचारीचा मुजरा’ आहे!
आमचा रोकठोक सवाल: अहो नेत्यांनो, चेहरा लपवून मतं मिळतीलही कदाचित, पण लक्षात ठेवा— जनतेच्या नजरेतून एकदा का तुमची नियत उतरली, की मग कितीही फोटो बदलले तरी इतिहास तुम्हाला माफ करणार नाही! ही कोंढव्यातली ‘फोटो-चोरी’ तुमच्या पराभवाची नांदी तर नाही ना?
सावधान! जनता सगळं बघतेय. फोटो काढला तरी तुमच्या मनातला ‘भीतीचा काळा डाग’ कसा काढणार?






























