घरात भजी खा, डोंगरावर जाऊ नका! खारघरच्या धबधब्यांवर पोलिसांची ‘नो एन्ट्री’; कायदा मोडल्यास कारवाईचा धबधबा नक्की!


घरात भजी खा, डोंगरावर जाऊ नका! खारघरच्या धबधब्यांवर पोलिसांची ‘नो एन्ट्री’; कायदा मोडल्यास कारवाईचा धबधबा नक्की!

सुनील पाटील :

वरुणराजाने आभाळातून पाण्याचे कारंजे काय सुरू केले, आमच्या मुंबई-ठाण्याच्या पर्यटकांच्या अंगात एकदम निसर्गप्रेमाचे वारं संचारले! पाठीवर सॅक, पायात स्लिपर आणि ओठांवर ‘ये रे ये रे पावसा’ म्हणत हे अतरंगी पर्यटक थेट खारघरच्या डोंगराकडे धाव घेऊ लागले आहेत. पण थांबा, जरा दमाने घ्या! जर तुम्ही या पावसाळ्यात खारघरच्या पांडवकड्यावर किंवा ओवेकॅम्प धरणावर जाऊन ‘रोमँटिक’ रील्स बनवण्याचा विचार करत असाल, तर जरा खिशातून दंड भरण्याची आणि पोलिसांच्या खाक्याची तयारी ठेवा. कारण, नवी मुंबई पोलिसांनी या सगळ्या उत्साही वीर-बहादुरांच्या आनंदावर विरजण घालत थेट ‘नो एन्ट्री’चा बोर्ड लावला आहे!

दरवर्षी पावसाळा आला की, डोंगर हिरवेगार होतात आणि आमचे पर्यटक डोळे पांढरे होईपर्यंत तिथं हुंदडायला जातात. वास्तविक पाहता, पांडव तिथे राहून गेले म्हणून त्याला ‘पांडवकडा’ म्हणतात; पण आजकालचे पर्यटक तिथे ज्या पद्धतीने कड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी काढतात, ते पाहता पोलिसांना प्रश्न पडलाय की हा ‘पांडवकडा’ आहे की ‘यमलोकाचा दरवाजा’

खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी अगदी डोक्याला हात लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. चाफेवाडी, फणसवाडी, ओवेकॅम्प धरण, आणि अगदी तळोजा जेलसमोरील डोंगर… या सगळ्या जागांवर गेल्या काही वर्षांत पर्यटकांनी इतके ‘उत्साही’ पराक्रम केले आहेत की, काहींना थेट रुग्णालयाची तर काहींना कायमचीच सुट्टी घ्यावी लागली आहे. पाण्यात बुडणे आणि दरीतून घसरणे हे तर इथले राष्ट्रीय खेळ झाल्यासारखे वागणाऱ्या या पर्यटकांमुळे पोलिसांना आता ‘खाकी’चा इंगा दाखवावा लागत आहे.

नागरिकांच्या जिवाची काळजी सरकारला आणि पोलिसांना जितकी आहे, तितकी कदाचित स्वतः नागरिकांनाही नसावी, हाच आजचा सर्वात मोठा विनोद आहे. म्हणूनच माननीय पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई यांच्या कार्यालयीन आदेशानुसार (दिनांक २५ जून २०२६), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १६३ अन्वये ही सर्व ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

याचा सरळ, सोपा आणि मराठी भाषेत अर्थ असा की, जर तुम्ही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पोलिसांच्या नाकावर टिच्चून या भागात घुसलात, तर निसर्गाचा आनंद मिळण्याऐवजी तळोजा जेलच्या समोरील डोंगर पाहता पाहता थेट तळोजा जेलच्या आत हवा खावी लागेल!

खारघर पोलिसांनी जागोजागी जाहीर सूचनांचे फलक लावले आहेत. ते फलक वाचून तरी काही जणांना सुबुद्धी सुचावी, हीच अपेक्षा. अतिउत्साहाच्या भरात आपल्या कुटुंबाला रडवत ठेवण्यापेक्षा, घरातच गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेत खिडकीतून पाऊस पाहणे कधीही अधिक शहाणपणाचे ठरेल.

शेवटी काय, निसर्ग तिथेच राहणार आहे, कडे-कपारी तिथेच राहणार आहेत… फक्त पुढच्या पावसाळ्यात ते पाहण्यासाठी तुम्ही सुरक्षित राहिले पाहिजे, इतकीच पोलिसांची माफक आणि ‘कडक’ इच्छा आहे! त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा, नाहीतर कायदेशीर कारवाईचा ‘धबधबा’ तुमच्यावर कोसळल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा विसरू नका!

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!