काम चोख, सन्मान रोख ! कविता काळेंच्या कर्तृत्वाचा रायगडच्या मातीत जल्लोष !


काम चोख, सन्मान रोख ! कविता काळेंच्या कर्तृत्वाचा रायगडच्या मातीत जल्लोष !

सुनील पाटील  :

अहो, प्रशासकीय खुर्चीवर बसून नुसते ‘फाईल’चे कागद न कापता, समाजातील अनिष्ट रूढींच्या छाताडावर नाचणाऱ्या एका रणरागिणीचा आज गौरव झालाय! त्या रणरागिणीचं नाव आहे— सौ. कविता सुरेश काळे! हल्ली अधिकारी मिळतात गल्लोगल्ली, पण कामाचा ठसा उमटवणारे मिळतात एखादेच. कविता काळे या अशा ‘जातकुळी’तल्या अधिकारी आहेत, ज्यांनी जिथे पाऊल ठेवलं, तिथे सोन्याचा धूर काढला नाही तरी चालेल, पण सामान्य माणसाच्या डोळ्यांतलं पाणी मात्र नक्कीच पुसलं!

१ मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथे रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य शासकीय ध्वजारोहण व गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार अदितीताई तटकरे आणि रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या शुभहस्ते कविता काळे यांना ‘प्रशस्तीपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांसारख्या दिग्गज मंडळींची उपस्थिती होती. हा गौरव म्हणजे काळेंनी आजवर सांडलेल्या घामाची आणि पारदर्शक कामाची मिळालेली खऱ्या अर्थाने ‘रॉयल पोचपावती’ आहे!

लोकांना वाटतं, ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं काम म्हणजे फक्त दाखले देणं. पण थांब! कविता काळेंनी ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम’ केवळ पुस्तकात वाचला नाही, तर तो प्रत्यक्ष अंमलात आणला. कोळखे (ता. पनवेल) येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. एका कोवळ्या कळीला लग्नाच्या आगीत होरपळण्यापासून वाचवून त्यांनी तिला शिक्षणाच्या अंगणात आणलं. शाब्बास कविताबाई! तुमच्या या एका धाडसानं एका मुलीचं आयुष्य सावरलं, हे कार्य कोणत्याही पदवीपेक्षा मोठं आहे!

करंजाडे असो वा कोळखे, कविता काळेंनी जिथे काम केलं, तिथे पारदर्शकतेचा झेंडा फडकवला. प्रशासकीय कामातली ‘कासवगती’ मोडून काढून त्यांनी ग्रामविकासाच्या योजनांची ‘एक्सप्रेस’ धावली. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव आज राज्य स्तरावर झाला आहे.

आज पनवेल परिसरात आनंदाच्या पेढ्या वाटल्या जातायत. का वाटू नयेत? असा ‘लोकाभिमुख’ आणि कर्तबगार अधिकारी मिळणं हे भाग्याचं असतं. कविता काळे, तुमच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळेल. तुम्ही रडणारी घरं हसवलीत आणि अडलेली कामं मार्गी लावलीत. तुमच्या या पुढील वाटचालीस ‘मराठा’ कार्तुसांसारखा कडक सलाम आणि लाख लाख शुभेच्छा! असाच तुमच्या कर्तृत्वाचा डंका वाजत राहू दे!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!