निडर लेखणी आणि शिक्षणाचा वसा ! ‘शिक्षण हक्क मंचा’तर्फे पुण्यात मेहबूब सर्जेखान, अकबर खान आणि मुस्ताकभाई जिकरे यांचा गौरव सोहळा संपन्न.


निडर लेखणी आणि शिक्षणाचा वसा ! ‘शिक्षण हक्क मंचा’तर्फे पुण्यात मेहबूब सर्जेखान, अकबर खान आणि मुस्ताकभाई जिकरे यांचा गौरव सोहळा संपन्न.

पुणे :  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘शिक्षण हक्क मंच’ पुणे व बहुजन पालक संघाच्या वतीने पुण्याच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पुण्यातील कॅम्प येथील शिक्षण हक्क मंचाच्या कार्यालयात रात्री आठ वाजता मतीनभाई मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामांकित वृत्तसंस्था ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे मुख्य संपादक मा. मेहबूब सर्जेखान आणि ‘अल्फाज टाइम्स’चे पत्रकार व निवृत्त मुख्याध्यापक मा. अकबर खान सर यांचा त्यांच्या प्रखर पत्रकारितेबद्दल गौरव करण्यात आला. मेहबूब सर्जेखान यांनी आपल्या लेखणीद्वारे तळागाळातील शोषित, पीडित, बहुजन आणि अल्पसंख्याक समाजाच्या गंभीर प्रश्नांना वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम निष्ठेने केले आहे. तसेच, निवृत्त मुख्याध्यापक अकबर खान सर यांनीही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील वंचितांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याची महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्यासोबतच, समाजातील गरजूंना विशेष शैक्षणिक मदत करून स्वावलंबी बनवणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुस्ताकभाई जिकरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. मतीन मुजावर सरांनी सत्कार करताना, ही तिन्ही व्यक्तिमत्त्वे समाजासाठी खऱ्या अर्थाने भूषण असल्याचे गौरवोद्गार काढले.

शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आलेल्या या सोहळ्याला पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते अहमदभाई सय्यद, आरपीआय (खरात गट) चे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते फिरोज मुल्ला सर आणि प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष नौशादभाई शेख यांची यावेळी प्रेरणादायी भाषणे झाली. वक्त्यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला दौलाभाई पिरजादे, इस्माईल भाई शेख, फिरोज खान, बागअली गोकाक, सलीम शेख, रफिक खान, करीम खान, रफिक सौदागर यांसह सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षक हक्क मंच व बहुजन पालक संघाचे शहर जिल्हाध्यक्ष चांदभाई बळबट्टी यांनी केले. समाजासाठी झटणाऱ्या या मान्यवरांचा हा सन्मान सोहळा उपस्थित सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!