प्रेस मीडिया लाईव्हने या घटनेचा निषेध करत कामकाज बंद ठेवले
पुणे: “दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी आपण स्वतः कुठे कमी पडलो, हे पाहणे गरजेचे आहे.” याच जाणिवेने प्रेस मीडिया लाईव्ह या वृत्तसंस्थेने आज सायंकाळपर्यंत आपले सर्व लेखन आणि कामकाज पूर्णपणे बंद ठेवून नसरापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला. समाजात जेव्हा अशी भीषण घटना घडते, तेव्हा केवळ बातमी देणे हे प्रसारमाध्यमाचे कर्तव्य असू शकत नाही. इतर बेजबाबदार घटकांप्रमाणेच आपणही समाज म्हणून कुठे ना कुठे अपयशी ठरलो आहोत, ही प्रांजळ कबुली देत हा ‘लेखन बंद’चा निर्णय घेण्यात आला.
यंत्रांचे जाळे, पण माणसाचे काय..?
नसरापूर येथे एका चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या, ही घटना सुसंस्कृत समाजाच्या काळजाला चटका लावणारी आहे. ६५ वर्षांचा आरोपी भीमराव कांबळे पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल करतो, पण हा विकृत माणूस इतकी वर्षे समाजाच्या नजरेतून सुटलाच कसा? आज आपण ए. आय. (AI) सारखे अचाट तंत्रज्ञान विकसित केले, पण स्वतःची उपजत संवेदनशीलता मात्र गमावून बसलो आहोत. गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण ते फक्त घडलेल्या पापाचे रेकॉर्डिंग करू शकतात; ते पाप रोखू शकत नाहीत. डोळ्यांना लेन्स लावली, पण काळजाला संवेदनांची दृष्टी नसेल, तर त्या यंत्रांचा उपयोग शून्य आहे.
१३५ कोटींचा देश आणि ‘स्वार्थी’ एकांत
भारताची लोकसंख्या १३५ कोटींच्या पार गेली आहे. माणसांच्या या महासागरात वावरताना संशयास्पद गोष्टी इतरांच्या नजरेतून सुटतातच कशा? आज आपण इतके स्वार्थी झालो आहोत का, की शेजारी काय जळतंय याचीही आपल्याला खबर नसते? ‘मला काय त्याचे?’ या वृत्तीमुळे समाजातील विकृतींचे फावते आहे. निसर्गाने माणसाला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवले, पण अशा घटना पाहिल्या की वाटतं, जंगलातील श्वापदंही या नराधमापेक्षा कैक पटीने बरी!
आता तरी डोळे उघडणार का..?
प्रेस मीडिया लाईव्हने आज कामकाजातून घेतलेली ही माघार केवळ निषेध नाही, तर ती समाजाच्या सुस्त झालेल्या भावनेला दिलेला एक धक्का आहे. जर आपण आपल्या आजूबाजूच्या निष्पाप जीवांचे रक्षण करू शकत नसू, तर आपल्या प्रगतीच्या गप्पा पोकळ आहेत. केवळ नराधमाला फाशी देऊन प्रश्न सुटणार नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘सतर्क’ आणि ‘संवेदनशील’ होण्याची आज खरी गरज आहे.


























