पाहिजे कामाचा माणूस, पाच वर्षांचा पाहुणा नको!’ – पुणेकरांचा स्पष्ट कौल
पुणे हे केवळ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी नाही, तर जागृत नागरिकांचे शहर आहे. इथला मतदार सुज्ञ आहे, तो नेत्याची भाषणेही ऐकतो आणि त्यांच्या कामाचा हिशोबही ठेवतो. सध्या पुणेकरांच्या राजकीय चर्चेत एकच सूर उमटत आहे— “आम्हाला केवळ निवडणुकीपुरता दिसणारा ‘पाहुणा’ नको, तर सुख-दु:खात धावून येणारा ‘माणूस’ हवा आहे.”
आश्वासनांचा पाऊस विरुद्ध कामाचा दुष्काळ
निवडणूक जवळ आली की प्रभागातील रस्ते चकाचक होतात, बॅनरबाजी वाढते आणि गल्लोगल्ली जनसंपर्क कार्यालयांचे पेव फुटते. हात जोडून मते मागणारे उमेदवार पाच वर्षांतून एकदाच दिसतात, हे चित्र आता पुणेकरांना नकोसे झाले आहे. मतदारांचा स्पष्ट आरोप आहे की, एकदा निवडून आले की अनेक नगरसेवक आपल्याच विश्वात मग्न होतात आणि सर्वसामान्यांचे प्रश्न वाऱ्यावर सोडले जातात.
पुणेकरांच्या नेमक्या अपेक्षा काय..?
सततचा संपर्क: नगरसेवक हा केवळ सण-समारंभाच्या बॅनरवर नको, तर प्रभागातील कचरा, पाणी आणि ड्रेनेजच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर हवा.
प्रशासकीय पाठपुरावा : महापालिकेत जाऊन आपल्या प्रभागासाठी निधी खेचून आणण्याची आणि अधिकाऱ्यांकडून कामे करून घेण्याची धमक लोकप्रतिनिधी मध्ये असावी.
दिसणारा विकास, नुसता देखावा नको :
केवळ रंगरंगोटी किंवा नावाच्या पाट्या लावणे म्हणजे विकास नाही. शिक्षण, आरोग्य आणि वाहतूक कोंडी यांवर ठोस काम करणाऱ्या नगरसेवकाला पुणेकर पसंती देत आहेत.
पाच वर्षांचा हिशोब हवा..!
आताचा पुणेकर विचारतोय— “संकट काळात तुम्ही कुठे होता?” मग तो कोरोनाचा काळ असो किंवा पावसाळ्यात साचलेले पाणी. जो नगरसेवक संकटाच्या वेळी नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला, तोच खऱ्या अर्थाने कौलास पात्र आहे. पाच वर्षे गायब राहून निवडणुकीच्या वेळी ‘तोंड दाखवणाऱ्या’ नेत्यांना आता मतदार घरचा रस्ता दाखवण्याच्या मनस्थितीत आहेत.
नगरसेवक हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा आहेत. त्यांनी स्वतःला ‘नगर-सेवक’ मानले पाहिजे, ‘नगर-मालक’ नव्हे. पुणेकरांचा कौल स्पष्ट आहे: जो जनतेच्या हितासाठी अहोरात्र तळमळीने काम करेल, जो घराघरातील सदस्यासारखा उपलब्ध असेल, तोच पुण्याचा खरा प्रतिनिधी ठरेल.
आता वेळ आली आहे, केवळ पक्षाला नाही तर ‘कर्तृत्वाला’ मत देण्याची!
“निवडणुकीपुरते नाते जोडणारे नकोत, तर कायमचे ऋणानुबंध जपणारा हक्काचा माणूस हवा!”


























