शासनाच्या ‘आर्थिक नाकेबंदी’विरोधात संस्थापक संतोष आठवले यांचा हल्लाबोल; जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
हातकणंगले (प्रतिनिधी): राज्यातील अनुसूचित जाती घटकांच्या विकासासाठी राखीव असलेल्या ‘अनुसूचित जाती उपयोजना’ (SCSP) निधीच्या अंमलबजावणीतील गंभीर त्रुटी, प्रशासकीय उदासीनता आणि निधीच्या कथित गैरवापराच्या निषेधार्थ आज ‘पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने’च्या वतीने हातकणंगले तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी शासनाच्या धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
निधीचा गैरवापर थांबवा: संतोष आठवले
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनेचे संस्थापक प्रमुख संतोष एस. आठवले यांनी शासनावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “शासन अनुसूचित जातींच्या विकासाचा हक्काचा निधी ‘लाडकी बहीण’ सारख्या इतर योजनांकडे वळवून या समाजाची आर्थिक नाकेबंदी करत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ११.८०% निधी मिळणे हा समाजाचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, लेखाविषयक पळवाटा शोधून हा निधी मूळ उद्देशापासून भरकटवला जात असून हा अन्याय आता सहन केला जाणार नाही.”
प्रशासनाला सादर केलेल्या प्रमुख मागण्या
जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
निधीत वाढ: आगामी अर्थसंकल्पापासून एकूण बजेटच्या किमान ११.८०% निधी SCSP साठी राखीव ठेवावा.
निधीचे वळवण थांबवा: सामान्य रस्ते, वीज किंवा इतर सार्वजनिक योजनांसाठी या विशेष निधीचा वापर करणे तत्काळ थांबवावे.
कॅरी फॉरवर्ड तरतूद: वर्षाअखेरीस शिल्लक राहिलेला निधी व्यपगत )ल न करता तो पुढील वर्षासाठी वर्ग करावा.
निवड निकष: लाभार्थी निवडीसाठी २००२ च्या जुन्या बीपीएल यादीऐवजी २०११ च्या आर्थिक व जातनिहाय जनगणनेचा (SECC) आधार घ्यावा.
भीम सैनिकांची मोठी उपस्थिती
या आंदोलनात पँथर आर्मीचे सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष बबन तांदळे, उपाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा महासचिव दिनेश कुमार दीक्षांत, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ. छायाताई सातारकर यांनी सहभाग घेतला. तसेच हुपरी शहर अध्यक्षा अर्चना कांबळे, आक्काताई कांबळे, हातकणंगले तालुका अध्यक्षा रेखा भोरे, शोभा कांबळे, निर्गुणा कांबळे यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला.
याव्यतिरिक्त पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे विद्याधर कांबळे, डॉ. विशाल साजणीकर, राजू मोमीन, पैगंबर मुजावर, समीर विजापुरे, शिरोळ तालुका अध्यक्ष भिकू कांबळे, भैय्यासाहेब धनवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.


























