पुण्याचा राजकीय ‘तमाशा’ आणि बंडखोरांचा ‘लावणी महोत्सव’! १६५ जागांसाठी ११६५ जणांचा ‘गोंधळ’!
पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर, संस्कृतीचा ठेवा! पण आज याच पुण्याच्या गल्लीबोळात जो काही राजकीय ‘तमाशा’ सुरू आहे, तो पाहून थोर समाजसुधारकांच्या आत्म्यालाही यातना होत असतील. महापालिकेच्या १६५ जागांसाठी तब्बल ११६५ उमेदवारांनी जो काही गराडा घातला आहे, तो पाहून ही निवडणूक आहे की पुण्याच्या रस्त्यावर भरलेली ‘राजकीय जत्रा’, असा प्रश्न पडतो!
बंडखोरीचा ‘लावणी महोत्सव’!
यंदाच्या निवडणुकीत पक्षाची निष्ठा गुंडाळून ठेवून प्रत्येक जण स्वतःचा ‘अबाबी’ मिरवायला निघाला आहे. युती आणि आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांना जे काही ‘एबी फॉर्म’चे वाटे दिले आहेत, त्यात कोणाचे सूत कोणाशी जुळले आहे, हे ब्रह्मदेवालाही कळणार नाही! बंडखोरी इतकी उफाळून आली आहे की, जणू पुण्यात ‘बंडखोरांचा लावणी महोत्सव’च भरला आहे. ज्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी “मी नाही तर कोणीच नाही” असा पवित्रा घेत, आपल्याच पक्षाच्या छाताडावर नाचायला सुरुवात केली आहे.
‘मैत्रीपूर्ण’ लढती की राजकीय लबाडी..?
युती आणि आघाडीतील मित्रपक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत आणि नेते सांगत आहेत—”ह्या तर मैत्रीपूर्ण लढती आहेत!” अरे, कसली आलीय ही मैत्री? हा तर भर दिवसा मतदारांच्या डोळ्यात घातलेला धुरळा आहे! स्वतःच्या स्वार्थासाठी उभ्या केलेल्या या लढती म्हणजे लोकशाहीचा निव्वळ थिल्लरपणा आहे.
कसब्यात ‘बाप तसा बेटा’ अन् बालवडकरांचा ‘राडा’!
कसब्याच्या आखाड्यात तर जुने हिशोब चुकते करण्यासाठी नवी पिढी मैदानात उतरली आहे. भाजपच्या गणेश बिडकरांसमोर माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी स्वतःच्या चिरंजीवांना—प्रणव धंगेकरांना—मैदानात उतरवून ‘वारसा’ राजकारणाचे प्रदर्शन मांडले आहे. तिकडे बालवडकरांच्या घरात तर ‘भावा-भावात’ जुंपली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत उडी मारलेल्या अमोल बालवडकरांनी स्वतःच्याच भावाविरोधात, लहू बालवडकरांविरोधात दंड थोपटले आहेत. ही तर पुण्याच्या राजकारणाला लागलेली घरभेदी कीडच म्हणावी लागेल!
पुणेकरांनो, सावधान!
शिवाजीनगर मध्ये रेश्मा भोसले आणि दत्ता बहिरट यांची ‘पुनरावृत्ती’ आणि सहकारनगरमधील आबा बागूल-सुभाष जगतापांची चुरस म्हणजे पुणेकरांच्या संयमाची परीक्षाच आहे. प्रभाग ३८ आणि कोंढवा-येवलेवाडीत तर उमेदवारांची इतकी गर्दी आहे की, मतपत्रिकेवर नाव शोधताना मतदाराला दुर्बीणच लावावी लागेल!
आमचा सवाल आहे— या ११६५ उमेदवारांमधील किती जणांना पुण्याच्या विकासाशी घेणं-देणं आहे..? की फक्त महापालिकेच्या सत्तेचा ‘मलिदा’ चाखण्यासाठी हा सर्व आटापिटा सुरू आहे..? पुण्याचा मतदार सुज्ञ आहे, तो या ‘तमाशा’तील सोंगाड्यांना नक्कीच धडा शिकवेल, यात शंका नाही.
बघूया, या राजकीय दलदलीत पुण्याचा ‘कमळ’ फुलतो की ‘घड्याळ’ नीट चालतं, की ‘हात’ दाखवून अवलीक्षण होतं!


























