रायगड पोलिसांचा ‘अंमली’ तस्करीवर सर्जिकल स्ट्राईक ! संदीपांचा ‘पाटील’की बाणा; पाताळगंगेत ४२ किलो अफूचा खेळ खल्लास!
खालापूर/ सुनिल पाटील :
तब्बल ४२ किलो अफूचं काळं रसायण, पंजाबचं कनेक्शन आणि पाताळगंगेच्या औद्योगिक पट्ट्यात सुरू असलेला हा ‘धुराळा’! रायगडच्या गुन्हे अन्वेषण विभागानं (LCB) काल जो काही धाडसी ‘छापा’ टाकला आहे, त्यानं नशेच्या व्यापार्यांचे पार धाबे दणाणले आहेत. सहाय्यक फौजदार संदीप पाटील नावाच्या एका कर्तबगार मर्दानं आपल्या नजरेचा असा काही ‘वॉच’ ठेवला की, पंजाबची ती अवजड गाडी रसायनीच्या उंबरठ्यावरच चारीमुंड्या चीत झाली!
गनिमी कावा आणि अचूक टप्प्यात शिकार..!
क्रेझ कशाची? तर म्हणे अंमली पदार्थांची! पण रायगड पोलिसांनी या नशेबाजांना चांगलंच शुद्धीवर आणलं आहे. सावरोली-पाताळगंगा रोडवर, बॉम्बे डाईंग कंपनीच्या समोर एका अशोक लेलँड ट्रकमध्ये (PB-10-EH-7597) मृत्यूचं सामान दडवून ठेवलं असल्याची ‘पक्की’ खबर संदीप पाटलांना लागली. मग काय? पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील आणि त्यांच्या फौजेनं तिथे असा काही सापळा रचला की, त्या ६४ आणि ७२ वर्षांच्या ‘म्हाताऱ्या’ तस्करांना पळून जायला साधी फटही उरली नाही!
६ लाखांचा ‘माल’ अन् ८ लाखांचा ‘खटारा’ जप्त !
पोलिसांनी जेव्हा त्या प्लास्टिकच्या गोण्या फाडल्या, तेव्हा त्यात सुमारे ४२.७३५ किलो अफू सदृश पावडर सापडली. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत साडेसहा लाखांच्या घरात आहे. तो ट्रक आणि हा माल मिळून तब्बल १४ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्येमाल पोलिसांनी एका झटक्यात ओढून काढला आहे. प्रेमसिंग हरदमसिंग आणि जैनरल जयराम सिंग या दोन्ही ‘अमली’ पाहुण्यांना पोलिसांनी सध्या बेड्या ठोकून कोठडीची हवा खायला पाठवलं आहे.
“पोलीस म्हणजे केवळ वर्दी नव्हे, तर ती एक जागती ज्योत आहे!” हेच जणू संदीप पाटील, सुधीर मोरे, रवी मुंडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं सिद्ध करून दाखवलं आहे.
खाकीचा दरारा..!
रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही कारवाई म्हणजे गुन्हेगारांच्या नरडीला नख लावणारा प्रकार आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमुख मिलिंद खोपडे यांच्या अचूक नियोजनामुळं आज रायगडची जनता सुटकेचा नि:श्वास सोडतेय. रसायनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ आता या प्रकरणाचं उरलेलं ‘मुंडकं’ छाटण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आमचा सवाल एकच आहे: पंजाबमधून एवढ्या लांब हा ट्रक येतोच कसा? आणि आला तर त्याला पाताळगंगेत पाय रोवायची हिंमत होतेच कशी? पण काळजी नसावी, जोपर्यंत संदीप पाटलांसारखे डोळ्यात तेल घालून पाहणारे अधिकारी रायगडच्या मातीत आहेत, तोपर्यंत अशा तस्करांचा ‘अंतिम संस्कार’ असाच होत राहणार!
शाब्बास, रायगड पोलीस! असाच तडाखा चालू द्या!




























