रामराज्य बँकेचे ‘नंदा’दीप की अंधारयुग? रिक्षाचालकांच्या घामावर डल्ला मारणारा कोंढव्यातील महाघोटाळा!

पुण्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात सध्या एकच खळबळ उडाली आहे. रामराज्य सहकारी बँक – नाव ऐकले की प्रभू रामचंद्राच्या आदर्शांची आठवण व्हावी, पण कोंढव्यातील या बँकेत मात्र ‘रावणराज्या’पेक्षाही भयाण प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे. या बँकेच्या अध्यक्ष आणि संचालिका नंदा लोणकर यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार नक्की कोणत्या दिशेला चालला आहे, असा संतप्त सवाल आता पुण्यातील सामान्य जनता विचारू लागली आहे.
बोगस कर्जाचा ‘मीटर’ आणि नंदाताईंचे मौन!
ज्या रिक्षाचालकाने दिवसभर उन्हातान्हात खपून आपल्या कुटुंबाची गुजराण करायची, त्याच रिक्षाचालकांच्या नावावर लाखो रुपयांचे ‘बोगस’ कर्ज उचलण्याचे महापाप इथे घडले आहे. टीव्हीएस शोरूमचे फिरोजशहा आणि अमीन शेख या जोडगोळीने जणू काही लूटमारीचा कारखानाच उघडला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणावर बँकेच्या सर्वेसर्वा नंदा लोणकर यांनी बाळगलेले मौन अनेक संशयांना जन्म देत आहे. नगरसेविका म्हणून मिरवताना गरिबांच्या मतांची जोगवा मागायचा आणि त्याच गरिबांच्या रिक्षांवर परस्पर डल्ला मारायचा, हा कोणता ‘राष्ट्रवादी’ विचार आहे?
७८ वर्षांच्या वृद्धाची क्रूर थट्टा!
रिझर्व्ह बँकेचे नियम धाब्यावर बसवण्यात ही बँक वस्ताद निघाली आहे. साठ वर्षांवरील व्यक्तींना कर्ज देताना नियम कडक असताना, ७८ वर्षांचे रशीद बनेमिया शेख यांच्या नावावर साडेचार लाखांचे कर्ज चढवले जातेच कसे? रशीद चाचांना कळलेच नाही की त्यांच्या मालकीची रिक्षा कधी ‘रामराज्य’च्या दावणीला बांधली गेली! एकाच रिक्षावर दोन-दोन बँकांची कर्जे? हा बँकिंगचा व्यवहार आहे की अलिबाबा आणि चाळीस चोरांची गुहा?
निवडणुकीच्या उंबरठ्यावर ‘डोकं’दुखी!
अमीन शेख नावाच्या ‘एजंट’ने दोन एकर जागेत तब्बल २०० रिक्षा जप्त करून ठेवल्या आहेत. हे म्हणजे गरिबांच्या चुलीत पाणी ओतण्यासारखेच आहे. या घोटाळ्यात जलील आणि अमीन या जोडगोळीने अनेक संसार उध्वस्त केले आहेत. आता निवडणुका तोंडावर आहेत, आणि नंदा लोणकर यांच्यासाठी हा ‘बँक घोटाळा’ गळ्यातील फास ठरण्याची चिन्हे आहेत. सत्तेच्या उबेत बसलेल्या संचालकांना या गरीब रिक्षाचालकांच्या तळतळाटाची झळ पोहचल्याशिवाय राहणार नाही.
शफिक पटेलांचा रणशिंग!
आझाद रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शफिक पटेल यांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणून भ्रष्टाचाऱ्यांचे मुखवटे फाडले आहेत. “बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताशिवाय हे शक्यच नाही,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
आमुचा सवाल आहे : अध्यक्ष महोदया नंदाताई, तुमच्या नाकाखाली गरीब रिक्षाचालकांची लूट होत असताना तुम्ही कुंभकर्णी झोपेत होतात का? की या लुटीच्या मलिद्यात कुणाकुणाचे हात रंगले आहेत? ज्यांच्या जीवावर राजकारण करता, त्याच रिक्षावाल्यांना रस्त्यावर आणण्याचे हे ‘रामराज्य’ जनता उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही!


























