फडतरे गुरुजींच्या संस्कारांचा ‘रप्पाटा’ अन् प्रेक्षकांच्या आसवांची साक्ष; मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास!


फडतरे गुरुजींच्या संस्कारांचा ‘रप्पाटा’ अन् प्रेक्षकांच्या आसवांची साक्ष; मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास!

– मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार :

दुनियेत सध्या ‘मोठ्या बॅनर’ नावाचा एक महाभयंकर रोग पसरला आहे! अवाढव्य जाहिराती, चमकधमक आणि कोट्यवधींच्या पीआर स्टंटबाजीने प्रेक्षकांचे डोळे दिपवून त्यांना चित्रपटगृहाकडे खेचण्याचे धंदे जोरात सुरू आहेत. पण लक्षात ठेवा, एखादी कलाकृती जेव्हा ‘आत्मा’ घेऊन जन्माला येते, तेव्हा तिला कोणत्याही सोन्याच्या पाळण्याची गरज नसते! ‘रप्पाटा’ या चित्रपटाने नेमके हेच सिद्ध करून दाखवले आहे. या चित्रपटाची जाहिरात कोणत्या मोठ्या एजन्सीने केलेली नाही, तर ती केली आहे  पुणे येथील पत्रकारिता क्षेत्रातील आघाडीचे वृत्त संस्था प्रेस मीडिया लाईव्ह ने व साध्या-भोळ्या मायबाप जनतेने! व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आज सामान्यांची लेखणी रप्पाटाच्या कौतुकासाठी सरसावली आहे, हीच या चित्रपटाची खरी आणि शाश्वत ‘विजयाची घोडदौड’ आहे.

पंचवटी ते राधाकृष्ण: प्रेक्षकांचा कडाडाटा..!

नाशिकच्या पंचवटी आणि राधाकृष्ण चित्रपटगृहांचे शो हाऊसफुल्ल व्हावेत, ही काही साधी गोष्ट नाही. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर सकाळी शो वाढवावे लागले, कारण या चित्रपटात जे ‘सत्य’ मांडले आहे, ते थेट काळजाला भिडणारे आहे. ज्यांना वाटले होते की मोठा बॅनर नाही म्हणजे हा चित्रपट थंडावेल, त्यांच्या श्रीमुखात या चित्रपटाने यशाचा असा काही ‘रप्पाटा’ लगावला आहे की, आता फक्त हाऊसफुल्लचे बोर्डच बोलत आहेत!

कथा: मध्यमवर्गीयांच्या आयुष्याचा आरसा

या चित्रपटात काय नाही? शिक्षणाचे महत्त्व सांगताना लेखकाने कुठेही अक्कल पाजळलेली नाही. त्यात हलके-फुलके विनोद आहेत जे पोट धरून हसायला लावतात, आणि पालकांची आपल्या मुलांसाठी होणारी दमछाक पाहून डोळ्यांत पाणी उभं राहतं. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या स्वप्नांची होळी करणारे मायबाप, त्यांच्या उराशी असलेली स्वप्ने आणि त्यांना संस्कारांचे बाळकडू देणारे शिक्षक… हे सगळं बघताना प्रेक्षक चित्रपटगृहात स्वतःलाच शोधू लागतो. माणूस मंत्रमुग्ध होतो, कारण पडद्यावर चाललेली गोष्ट ही त्याची स्वतःची व्यथा आणि कथा आहे!

महमद रफीक मांगुरे : अभिनयाचा जिवंत आविष्कार!

या चित्रपटाचा खरा कणा म्हणजे अभिनेते महमद रफीक मांगुरे सर! त्यांनी साकारलेले ‘फडतरे गुरुजी’ म्हणजे निव्वळ अभिनय नाही, तर रक्तामांसाचा एक आदर्श उभा केला आहे. एका शिक्षकाची निष्ठा, त्याची तळमळ आणि त्याचे संस्कार त्यांनी अशा काही पद्धतीने मांडले आहेत की, पडद्यावरचा तो माणूस आपल्याला आपलाच गुरुजी वाटू लागतो. त्यांची ही भूमिका मराठी चित्रपटसृष्टीत ‘अविस्मरणीय’ म्हणून सुवर्णअक्षरांनी कोरली जाईल, यात तिळमात्र शंका नाही.

अन् प्रेक्षक रडतच बाहेर पडतात…

चित्रपट पाहून बाहेर येणारा प्रत्येक प्रेक्षक जेव्हा ओल्या डोळ्यांनी बाहेर पडतो, तेव्हा समजावे की कलेचा हेतू साध्य झाला. ज्या चित्रपटाने माणसाच्या डोळ्यांत पाणी आणि मनात विचारांचे चक्र सुरू केले, त्या चित्रपटाने इतिहास रचला असेच म्हणावे लागेल. ‘रप्पाटा’ने केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजमनावर संस्कारांचा ओरखडा उमटवला आहे.

माझा सवाल आहे त्या लोकांना, जे म्हणतात मराठी चित्रपट पाहायला कोणी येत नाही! या आणि ‘रप्पाटा’चा हा झंझावात पहा. वेळात वेळ काढून, संसाराची गाठोडी बाजूला ठेवून सहकुटुंब पहावा असा हा चित्रपट आहे. जा, पहा आणि अनुभवया हा ‘रप्पाटा’!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!