शाळा हीच राष्ट्राची गंगोत्री; उद्योजकांनो, नफ्याची तिजोरी आता विद्येसाठी खुली करा !


उद्योजक जालिंदर कातकडे यांचे पुण्यात रोखठोक प्रतिपादन; श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये दातृत्वाचा सोहळा

पुणे |  ज्या शाळांतून उद्याचा प्रज्ञावंत डॉक्टर, करारी न्यायाधीश आणि ध्येयवादी सैनिक घडतो, ती शाळा म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने राजमार्ग आहे! हीच जाणीव ठेवून समाजातील सधन घटकांनी आणि उद्योगपतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपली तिजोरी खुली करणे, ही केवळ मदत नसून ते एक पवित्र ‘नैतिक कर्तव्य’ आहे, अशा शब्दांत नामवंत उद्योजक जालिंदर कातकडे यांनी आज पुण्यात उद्योजकांना कर्तव्याची जाणीव करून दिली.

निमित्त होते, शुक्रवार पेठेतील ऐतिहासिक श्री शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीचा सोहळा! शुक्रवार, दि. २० मार्च रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात कातकडे यांच्या दातृत्वाचा वर्षाव पुणेकरांनी अनुभवला.

‘सीएसआर’ नव्हे, तर माणुसकीचा ओलावा!

आजच्या काळात प्रत्येक गोष्ट ‘नफ्या-तोट्याच्या’ तराजूत तोलली जाते. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या **’कॅसल डाएज अँड टूल्स’**चे मालक जालिंदर कातकडे यांनी कोणत्याही ‘सीएसआर’ फंडाच्या तांत्रिक फायद्याचा विचार न करता, केवळ विद्यार्थ्यांबद्दलच्या प्रेमापोटी तब्बल ५ लाख रुपयांचे साहित्य अर्पण केले. ३०० विद्यार्थ्यांना सुबक पीटी युनिफॉर्म आणि ३२५ विद्यार्थ्यांना दर्जेदार स्पोर्ट्स शूज व सॉक्स देऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवले. “विद्यार्थी ही राष्ट्राची चालती-बोलती गुंतवणूक आहे,” असे सांगत त्यांनी शिक्षणाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.

पुस्तकांचे संचित आणि वैचारिक पाठबळ

केवळ पेहराव बदलून चालत नाही, तर मस्तकही सुधारावे लागते, हाच विचार मांडत प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी प्रशालेच्या ग्रंथालयास थोर विचारवंतांची प्रेरणादायी पुस्तके भेट दिली. वाचन संस्कृती लोप पावत असताना, या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वैचारिक जडणघडण व्हावी, हा उदात्त हेतू त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

शिक्षकांचा ध्येयवाद आणि कष्टाचे फळ

सामान्य कुटुंबातील पोरं गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत, ही कळकळ बाळगून प्रा. डॉ. स्मिता खोपडे यांनी या मदतीचा यशस्वी पाठपुरावा केला होता. “आम्ही केवळ शिक्षक नाही, तर या मुलांचे पालक आहोत,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. प्राचार्य हनुमंत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला, तर पाहुण्यांचा परिचय अरविंद मोडक यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. राणी झोडगे यांनी केले, तर सुवर्णा कोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात या मदतीची चर्चा सध्या मोठ्या अभिमानाने होत आहे.

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!