युती झाल्यास ‘३० जागांची ऑफर’ अमान्य, भ्रष्टाचाराविरोधात दंड थोपटले

पुणे महापालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, त्याला रोखण्याचे काम शिवसेना करणार आहे, असे स्पष्ट करत आमदार रविंद्र धंगेकर यांनी आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची भूमिका मांडली. युतीचा निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी, शिवसेनेने महापालिकेच्या सर्व १६५ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी पूर्ण केली आहे.
आमदार धंगेकर यांनी सांगितले की, “पुण्याचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे.”
‘सन्मानजनक’ जागांसाठी आग्रह; ३० जागांची ऑफर अमान्य
आगामी निवडणुकीसाठी युती करायची की नाही, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते चर्चा करून घेणार आहेत. मात्र, जागा वाटपाबाबत शिवसेनेने आपली भूमिका ठाम ठेवली आहे. धंगेकर यांनी स्पष्ट केले की, “पुण्यात युतीमध्ये जर शिवसेनेला केवळ ३० जागा देणार असतील, तर ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही आमची पूर्ण तयारी करत आहोत.” शिवसेनेने सर्वच्या सर्व १६५ जागांवर तयारी केल्याने युती झाल्यास सन्मानजनक जागा मिळवण्यावर पक्षाचा भर राहणार आहे.
मुंढवा जमीन प्रकरणी दोषींवर कारवाई करा
यावेळी धंगेकर यांनी प्रशासनातील गैरप्रकारांवरही आवाज उठवला. “मुंढवा जमीन प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत,” असे त्यांनी नमूद केले. “जे चुकीचे वागत आहेत, त्यांच्याविरोधात मी बोलणार,” असे सांगत त्यांनी महापालिकेच्या कामकाजातील अनियमिततेवर प्रहार केला.


























