धक्कादायक: जळगाव जिल्ह्यातील पिळोदे येथे मुस्लिम कब्रस्तानावर थेट हल्ला; झाडांची कत्तल, कबरींची विटंबना

पिळोदे, ता. अमळनेर, जि. जळगाव: (१५ डिसेंबर २०२५) – जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेल्या पिळोदे गावात दिनांक १३/१२/२०२५ रोजी जातीय द्वेष आणि धार्मिक कट्टरतेतून अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे. सरपंच, त्यांचे पती व मुलगा, उपसरपंच व त्यांचा मुलगा, ग्रामसेवक आणि त्यांच्यासोबत असलेल्या गुंड टोळीने पिळोदे येथील मुस्लिम समाजाच्या पवित्र कब्रस्तानावर थेट हल्ला चढवला असल्याचा आरोप पीडित समाजाने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन आलेल्या या टोळीने दोन बुलडोझर, जेसीबी आणि मोठ्या मशीनरीसह कब्रस्तानात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता कब्रस्तानात मोठे नुकसान केले.
३००० हून अधिक झाडांची कत्तल आणि कबरींची विटंबना
या गुंडांनी दोन दिवस धुडगूस घालून सुमारे ३००० पेक्षा जास्त जिवंत झाडांची निर्दयीपणे कत्तल केली. तसेच, अनेक जुन्या कबरी उखडून मृतांचे अवशेष उघड्यावर फेकून कब्रस्तानाची विटंबना केली. या कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या असून, गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कृत्याला ‘विकास’ म्हणता येणार नाही, तर हा सरळसरळ धार्मिक द्वेष, दहशत आणि मुस्लिम समाज नष्ट करण्याचा कट असल्याचा थेट आरोप पीडित समाजाने केला आहे. कायदा, प्रशासन आणि आदेशांना पायदळी तुडवून राज्यसत्तेलाच आव्हान देणारा हा गुन्हा असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची मागणी
या घटनेमुळे संपूर्ण मुस्लिम समाज स्वतःला असुरक्षित समजत आहे. “आज मुस्लिम समाज, उद्या कोण?” असा प्रश्न उपस्थित करत, या आवाजाला दाबले गेल्यास इतिहास माफ करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या घटनेसंदर्भात मुख्य मागण्या:
न्याय हवा
सर्व गुन्हेगारांना (सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि गुंड टोळी) त्वरित अटक झालीच पाहिजे.
धर्माच्या नावावर होणारी दहशत थांबलीच पाहिजे.
या गंभीर घटनेकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील, असा इशारा देण्यात आला आहे.



























