श्री छत्रपती व्यायाम मंडळ’ ठरले तालुक्यात उत्कृष्ट; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख रकमेसह गौरव !


‘श्री छत्रपती व्यायाम मंडळ’ ठरले तालुक्यात उत्कृष्ट; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख रकमेसह गौरव !

इचलकरंजी : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत इचलकरंजी येथील गावभाग परिसरातील श्री छत्रपती व्यायाम मंडळाने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या मंडळाचा विशेष गौरव करण्यात आला.

सामाजिक प्रबोधनाची परंपरा कायम

येथील गावभाग परिसरातील श्री छत्रपती व्यायाम मंडळ हे केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता, वर्षभर विविध सण आणि उत्सवांच्या माध्यमातून कला व संस्कृती जपण्याचे काम करते. मंडळाने नेहमीच समाजप्रबोधनात्मक विषयांवर भर दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळाने आधुनिक काळातील धकाधकीच्या जीवनावर आधारित ‘योग आणि प्राणायाम’ ही संकल्पना मांडली होती. सदृढ शरीरासाठी योगाचे महत्त्व पटवून देणाऱ्या या हलत्या देखाव्याने गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मंडळाचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजू पुजारी आणि मार्गदर्शक बाळासाहेब सोलगे यांनी २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र स्वीकारले.

शासकीय निकषांनुसार पार पडलेल्या या स्पर्धेत देखाव्यातील नाविन्यता, सामाजिक संदेश, शिस्त आणि मंडळाचे वर्षभरातील कार्य या सर्व बाबींचा विचार करून मंडळाची निवड करण्यात आली. या गौरव सोहळ्याप्रसंगी विविध शासकीय अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व स्तरांतून कौतुक

श्री छत्रपती व्यायाम मंडळाने मिळवलेल्या या यशामुळे इचलकरंजी शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. या यशाबद्दल मंडळाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, शहरात आनंदाचे वातावरण आहे.

 

 

 

 

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!