स्वतःला घडवण्याचा संकल्पच विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा; पन्हाळा विद्यामंदिर मध्ये प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन”


स्वतःला घडवण्याचा संकल्पच विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा; पन्हाळा विद्यामंदिर मध्ये प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन”

पन्हाळा: प्रतिनिधी “शिक्षक, पालक आणि समाजाकडून मिळणारे चांगले संस्कार अंगी बाणवून स्वतःला घडवण्याचा संकल्प करणे, हाच विद्यार्थ्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा संकल्प असतो. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती, विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत आपले व्यक्तिमत्व विकसित करावे,” असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी केले.

पन्हाळा एज्युकेशन सोसायटीच्या पन्हाळा विद्यामंदिर येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गिरीश नानिवडेकर होते, तर उपाध्यक्ष माधव गुळवणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रसाद कुलकर्णी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

पालकांची जबाबदारी: मुलांचे लाड आणि अतिलाड यातील सीमारेषा पालकांनी ओळखली पाहिजे. मुलांना संघर्षाशिवाय सर्व गोष्टी सहज उपलब्ध करून देणे म्हणजे वैचारिक दारिद्र्य आहे.

मोबाईलचा धोका: मोबाईलचा अतिवापर हे एक ‘राष्ट्रीय संकट’ बनत आहे. रिल्स आणि चॅटिंगमुळे मानवी तास वाया जात असून मुलांमध्ये आळस व चिडचिडेपणा वाढत आहे.

नैसर्गिक बुद्धिमत्ता श्रेष्ठ: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातही मानवाची नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि अवांतर वाचनच श्रेष्ठ ठरेल.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:

प्रकाशन : पाहुण्यांच्या हस्ते ‘अक्षरवेल’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.

सत्कार : विविध स्पर्धांत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक व आभार: मुख्याध्यापिका सौ. व्ही. पी. जमदग्नी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सौ. आर. जे. तांदळे यांनी आभार मानले. समृद्धी फल्ले व गार्गी नाखरे यांनी सूत्रसंचालन केले.

या सोहळ्याला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!