खिसा रिकामा, ताट रिकामं… पण नंबर प्लेट मात्र ‘हाय सिक्युरिटी’!
( मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार )
आजच्या या ‘डिजिटल’ भारतात सामान्य माणसाची अवस्था कशी आहे? तर – “खिशात नाही आणा, आणि मला बाजीराव म्हणा!” पण फरक इतकाच की, इथला बाजीराव आता स्वतःहून नाही, तर सरकारच्या आणि बँकांच्या जुलुमामुळे भिकेला लागला आहे.
तज्ञांची ‘अक्कल’ आणि लोकसंख्येचं खूळ!
काही पांढरपेशी तज्ञ आता गळे काढून सांगतायत की, “महागाई का वाढतेय? तर म्हणे लोकसंख्या वाढत आहे!” काय ही अगाध बुद्धी! अहो तज्ञ महाशय, लोकसंख्या वाढली की हातही वाढतात, काम करण्याची शक्ती वाढते. पण तुमच्या लेखी गरिबाचं पोट म्हणजे केवळ ‘वाढलेली लोकसंख्या’ आणि श्रीमंतांची संपत्ती म्हणजे ‘देशाचा विकास’! गॅस हजारवर गेला कारण लोकसंख्या वाढली? की तुमच्या धोरणांचे वांधे झाले? साध्या भाषेत सांगायचं तर— “अक्कल विकून लोकसंख्येच्या गप्पा मारणाऱ्या या तज्ञांना आधी महागाईच्या रांगेत उभा करा, मग त्यांना लोकसंख्येचे पाढे आठवतील!”
बँकेचा नवा जुलूम: ‘मिनिमम बॅलन्स’चा फास!
आता बँकांचे नवे नियम आलेत— म्हणे खात्यात ‘मिनिमम बॅलन्स’ ठेवा! अहो बँकर साहेब, ज्या माणसाला रोज सकाळी उठल्या उठल्या ५०० रुपये खर्च करावे लागतात, ज्याचा लाख रुपये पगार असूनही घरभाड्यामुळे खिसा फाटलेला असतो, त्याने तुमच्या खात्यात ‘बॅलन्स’ कुठून ठेवायचा? ही बँक आहे की गरिबांना लुटणारी ‘अधिकृत टोळी’? माणसाच्या पोटात ‘मिनिमम’ अन्न नाही, आणि तुम्हाला खात्यात ‘मॅक्झिमम’ बॅलन्स हवाय?
केवायसीचा ‘कळस’ आणि नंबर प्लेटचा ‘तमाशा’!
महागाईने माणूस आधीच मेला असताना, सरकार त्याच्या प्रेताकडे आधार कार्ड मागतेय! “आधार लिंक करा”, “केवायसी करा”… त्यात भर म्हणून आता ती HSRP नंबर प्लेट! ज्या माणसाला स्वतःच्या उद्याच्या जेवणाची ‘सिक्युरिटी’ नाही, त्याला तुम्ही नंबर प्लेटची ‘हाय सिक्युरिटी’ विकताय? घरभाडं भरायला पैसे नाहीत, पण नंबर प्लेट चकाचक हवी! वाह रे तुमची न्यायबुद्धी!
जनतेचा हुंकार आणि आमचा सवाल..!
हे जे काही मी आज लिहितोय, ते काही कल्पनेतलं रडगाणं नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चहाच्या टपरीवर, बसच्या रांगेत आणि मध्यमवर्गीयांच्या घराघरांतून जो संताप व्यक्त होतोय, त्या जनतेच्या चर्चेतूनच हा लेख जन्मला आहे. लोकांच्या डोळ्यांतील अश्रू आणि शब्दांतील ठिणग्या मी फक्त कागदावर उतरवल्या आहेत.
लक्षात ठेवा, जेव्हा रिकाम्या पोटाचा आवाज होतो, तेव्हा कोणत्याही बँकांचे नियम, तज्ञांचे सल्ले आणि ‘हाय सिक्युरिटी’च्या भिंती टिकत नाहीत. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, नाहीतर हीच जनता तुमचं ‘लॉगिन’ कायमचं बंद केल्याशिवाय राहणार नाही!


























