कोंढव्याचा रस्ता बनला बोकडांचे ‘बेडरूम’
पुण्याला ‘विद्येचे माहेरघर’ म्हणतात, पण सध्या कोंढव्यात गेल्यावर असं वाटतं की हे शहर म्हणजे मेषपात्रांच्या विरंगुळ्याचं केंद्र झालंय! ज्या रस्त्यांवरून पुणेकरांनी चालायचं, गाड्या पळवायच्या, तिथे आता साक्षात ४५ हजारांचे बोकड लोळताना दिसत आहेत. कोंढव्याचा मुख्य रस्ता आता रस्ता उरलेला नसून, तो या बोकडांचा जणू काही ‘बेडरूम’ बनला आहे.
रस्त्यावर गाड्यांच्या हॉर्नऐवजी आता ‘मॅॅॅ-मॅॅॅ’चे स्वर ऐकू येत आहेत. एखादा पादचारी चुकून रस्त्यावरून जायचा प्रयत्न केला, तर हे बोकड त्याच्याकडे अशा नजरेने पाहतात, जणू काही तो त्यांच्या खाजगी बेडरूममध्ये विनापरवाना घुसलेला एखादा ‘अतिरेकी’च आहे! शाळा-कॉलेजला जाणाऱ्या मुलांची तर अवस्था बिकट आहे; त्यांना आता भूगोलाच्या नकाशापेक्षा या बोकडांच्या शिंगांतून मार्ग काढायची कला जास्त अवगत करावी लागत आहे.
विशेष म्हणजे, या बोकडांच्या किमती ऐकून तर अच्छे-अच्छे ‘स्मार्ट’ पुणेकरही चक्रावून गेलेत. एका बोकडाचा भाव ४५ हजार रुपये! साहेब, ज्या बोकडाची किंमत एखाद्या आयफोनपेक्षा जास्त आहे, त्याला रस्त्यावर झोपायला लावण्यापेक्षा प्रशासनाने एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम का बुक करून दिली नाही? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. पण या ‘श्रीमंत’ बोकडांनी रस्त्यावर जी काही घाण आणि दुर्गंधी पसरवली आहे, त्याने मात्र सामान्य कोंढवेकर अक्षरशः ‘हलाल’ व्हायची वेळ आली आहे.
आमचा महापालिकेचा आरोग्य विभाग तर सध्या कोणत्या ‘ब्युटी पार्लर’मध्ये बसलाय कुणास ठाऊक! रस्त्यावर बेकायदेशीर पत्र्याचे शेड ठोकले जातात, बोकड तिथेच खातात, तिथेच झोपतात आणि तिथेच आपली ‘विधी’ उरकतात; पण प्रशासनाला मात्र याचा सुगंधच येत असावा. आरोग्य प्रमाणपत्र नाही, परवाना नाही, फक्त आहे ती प्रशासनाची ‘मेहेरबानी’ आणि नागरिकांची ‘परेशानी’!
आम्हाला प्रशासनाला एकच विचारायचंय— जर कोंढव्याचे रस्ते बोकडांचे बेडरूम होणार असतील, तर मग पुणेकरांनी टॅक्स कशासाठी भरायचा? बोकड ४५ हजारांचे आहेत म्हणून प्रशासन त्यांच्यासमोर नतमस्तक झालंय की काय? अहो, रस्ते मोकळे करा आणि या बेकायदेशीर मंडईचा ‘खीमा’ करा, अन्यथा नागरिकच आता रस्त्यावर उतरून प्रशासनाचा ‘बकरा’ केल्याशिवाय राहणार नाहीत!
साहेब, पुण्याला ‘स्मार्ट’ बनवाच, पण आधी माणसांना रस्त्यावरून चालता येईल इतकं तरी ‘शहाणं’ व्हा!


























