ग्रामपंचायतीचा कारभार आणि गटाराचा दरवळ; मोहपाडा वासंबे परिसरात स्वच्छतेची ‘बोंबाबोंब’!

सुनील पाटील
‘स्वच्छता हीच सेवा’ वगैरे वगैरे घोषणांचे ढोल सध्या मोहपाडा वासंबे परिसरात असे काही वाजवले जात आहेत की, बिचाऱ्या नागरिकांचे कान सुन्न झाले आहेत; पण दुर्दैवाने नाके मात्र अद्याप उघडीच आहेत! घोषणांचा सुवास हवेत असला तरी प्रत्यक्षात मोहपाड्याच्या गटारांमधून येणारा उग्र दर्प मात्र थेट ‘स्वर्गाची’ अनुभूती देतो आहे. आता प्रश्न उरलाय इतकाच की, ही गटारे आणि सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई नेमकी होणार केव्हा? की ग्रामपंचायतीने ‘पावसाची वाट पहा, म्हणजे निसर्गच सर्व कचरा धुऊन नेईल’ अशी काही अध्यात्मिक भूमिका घेतली आहे?

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, गुलाल उडाला, पेढे वाटून झाले; पण त्या गुलालाच्या रंगात मोहपाड्याचा कचरा मात्र पुढार्यांना दिसेनासा झाला आहे. आमचे लोकप्रतिनिधी याच भागातून ‘धडाकेबाज’ मिरवणुका काढतात, पण गल्लीतल्या तुंबलेल्या गटारांकडे पाहताना त्यांना अचानक ‘दृष्टीदोष’ होतो की काय, अशी शंका येते. आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे कर्तव्य विसरून हे लोक नक्की कोणत्या विकासाच्या गप्पा मारत आहेत आणि लोकांच्या प्रश्नांकडे कानाडोळा का करत आहेत, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
रीस गाव ते गणपती घाट हा रस्ता म्हणजे साक्षात आरोग्याची परीक्षाच ठरत आहे. येथील दुकानदार आपल्या दुकानाचा सर्व ‘कचरा-प्रसाद’ थेट गटारात अर्पण करत आहेत. मटण-मच्छी विक्रेत्यांनी तर गटारांवरच अतिक्रमण करून त्यात कचरा टाकल्याने ही गटारे आता पावसाळ्यापूर्वीच तुडुंब भरली आहेत. गणपती घाटावर भक्तीचा प्रवाह असायला हवा, तिथे कचऱ्याचे ढिगारे पाहून प्रशासनाला याची लाज वाटत नाही का?
ग्रामपंचायतीने लक्षात ठेवावे की, एप्रिल-मे महिन्यात पावसाळापूर्व नाले सफाई करणे हे काही लग्नाचं निमंत्रण नाही की मुहूर्त काढून यावं लागेल! १५ व्या वित्त आयोगाचा निधी सांडपाणी व्यवस्थेसाठी वापरणे बंधनकारक असताना, तो नक्की कुठे ‘मुरतो’ आहे? नाल्यातला गाळ उपसून तो पुन्हा काठावरच ठेवायचा हा कोणता अजब कारभार आहे? पावसाळा दारावर असूनही प्रशासन अजून कुंभकर्णी झोपेतच आहे. पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले, तर त्याला ही ग्रामपंचायत जबाबदार राहील. मोहपाडा वासंबे ग्रामपंचायतीने आता तरी जागे व्हावे, नाहीतर लोकांच्या संतापाच्या लाटेत वाहून जाण्याची वेळ प्रशासनावर येईल, हे निश्चित!


























