कॅन्सरची शेती करणाऱ्या गुटखा माफियांवर आता तरी ‘मकोका’चा बडगा पडणार का? रायगडकरांचे एसपींकडे लक्ष..!


कॅन्सरची शेती करणाऱ्या गुटखा माफियांवर आता तरी ‘मकोका’चा बडगा पडणार का? रायगडकरांचे एसपींकडे लक्ष!

रायगड/खालापूर – सुनील पाटील

(प्रेस मीडिया लाईव्ह)

रायगड जिल्हा खालापूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. मु्द्देमालासह आरोपींना बेड्या ठोकल्या. याबद्दल खालापूर पोलिसांचे करावे तेवढे कौतुक थोडेच! टाळ्या… खालापूर पोलिसांसाठी कडक टाळ्या वाजल्याच पाहिजेत! पण, पण आणि पण… या टाळ्यांच्या कडकडाटात आम्हांला एक प्रश्न पडला आहे, जो रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल मॅडम यांच्या दरबारात मांडणे अगत्याचे आहे.

कोटींचा गुटखा पकडला, पण पुडीचं काय..? अहो, साखरेच्या गोदामावर धाड टाकली की कौतुक होतच, पण गल्लीगल्लीतल्या मुंग्यांचं काय करायचं? आज रायगड जिल्हा असो, पनवेलचा भाजी बाजार असो की मुंबई-गोवा महामार्ग; पानटपरीच्या नावाखाली ‘यमराजाची दुकानं’ उघडी आहेत. प्रत्येक पानटपरीवर हा गुटख्याचा राक्षस जीभ बाहेर काढून बसलेला दिसतो. प्रशासन म्हणतं बंदी आहे, सरकार म्हणतं २०२५ च्या अखेरीस गुटखा विक्रेत्यांवर मकोका (MCOCA) लावू, पण प्रत्यक्षात मात्र या टपऱ्यांवर गुटख्याचा धूर आणि वास सर्रास येतो. हे कसलं नवल?

कर्करोगाची शेती आणि सुस्त प्रशासन गुटखा खाल्ला की काय होतं? तोंड येतं, घसा जातो, अन्ननलिका सडते, यकृत-मूत्रपिंड निकामी होतात आणि शेवटी यमराज स्वतः रेडा घेऊन उभा असतो! हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. तरीही, शाळा-महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात हे विष विकलं जातंय. पोलीस आणि एफडीए (FDA) यांना हे दिसत नसेल तर मग चष्म्याचा नंबर वाढलाय असं समजावं का? की ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांमुळे डोळ्यांवर पट्टी बांधली गेली आहे?

मकोकाचं गाजर की कायद्याचा बडगा?

२०१२ पासून राज्यात गुटखाबंदी आहे, तरीही ट्रकच्या ट्रक भरून विष राज्यात येतंय. आता सरकार म्हणतंय आम्ही गुटखा माफियांवर ‘मकोका’ लावू, जामीन कठीण करू. अहो, मकोका सोडा, साध्या हवालदाराने जरी काठी फिरवली तरी पानटपरीवरचा गुटखा गायब होतो, पण इथे तर ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ असा व्यवहार चाललेला दिसतोय.

आंचल दलाल मॅडम, आता तुमचीच आशा! श्रीमती आंचल दलाल मॅडम, तुम्ही कर्तव्यदक्ष आहात यात शंकाच नाही. आमची कळकळीची विनंती एवढीच की, फक्त मोठे मासे पकडून थांबू नका. ज्या पानटपऱ्यांवर हा माल विकला जातो, त्यांचं जाळं तोडा. ज्या दिवशी छोट्या टपरीवर माल मिळणं बंद होईल, त्या दिवशी या गुटखा सम्राटांच्या ट्रकना कुणी वाली उरणार नाही.

पनवेलच्या भाजी मार्केटपासून ते लेडीज बारपर्यंत हे जे ‘विष’ वाटलं जातंय, त्यावर साहेबांनी आता चाबूक फिरवलाच पाहिजे. रायगडची जनता पाहत आहे—तपास मकोकापर्यंत जाणार की कागदाच्या फाईलमध्ये गुंडाळून पडणार?

थोडक्यात काय.? तर गुटखा खाऊन पिचकारी मारणाऱ्यांपेक्षा, कायद्याची पिचकारी गुटखा विक्रीवर मारली गेली पाहिजे!

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!