२८ दिवसांचा महिना आणि डिजिटल पेंढारी..! टेलिकॉम कंपन्यांच्या ‘अंक-अर्थशास्त्रा’चा कडेलोट!
लेखक: मेहबूब सर्जेखान ज्येष्ट पत्रकार
नमस्कार..! ‘ सध्या देशात थंडीचे दिवस आहेत असं वाटत असतानाच, सामान्य माणसाच्या खिशाला जी आग लागली आहे, ती पाहून आमचा पारा चांगलाच चढला आहे. अहो, पूर्वी माणूस प्रेमात पडला की वेडा व्हायचा, आता तो मोबाईलचा ‘बॅलन्स’ संपला की वेडा होतोय! या टेलिकॉम कंपन्यांनी सामान्य जनतेची जी काही अवस्था करून ठेववली आहे, ती पाहून आम्हाला साक्षात मोगलाईतल्या लुटमारीची आठवण येतेय.
जगाचा नियम आणि कंपन्यांची मग्रुरी..!
एक म्हण आहे, “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये!” आमच्या या टेलिकॉम कंपन्यांनी या म्हणीचा अगदी पुरेपूर आणि शब्दशः वापर करून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांना माहिती आहे की, आजच्या काळात माणसाला अन्नाशिवाय एकवेळ चालेल, पण डेटा आणि नेटवर्कशिवाय चालणार नाही. याच हतबलतेचा फायदा घेऊन या कंपन्यांनी जनतेला अक्षरशः गुडघ्यावर टेकवलं आहे. “आम्ही दर वाढवणार, आम्ही महिना २८ दिवसांचाच ठेवणार, जमतंय का बघा…” अशी ही यांची मुजोरी! अहो, हा व्यापार नाही, ही तर सरळ सरळ ‘डिजिटल दादागिरी’ आहे!
२८ दिवसांचे अजब ‘अंक-अर्थशास्त्र’!
जगातल्या सर्व पंचांगांमध्ये महिना ३० किंवा ३१ दिवसांचा असतो, पण आमच्या या कंपन्यांच्या ‘डिक्शनरी’त महिना फक्त २८ दिवसांचाच असतो! काय अजब तर्कशास्त्र आहे हे? अहो, विधात्याने सुद्धा वर्षाचे १२ महिने केले, पण या कंपन्यांनी आपल्या सुपीक मेंदूतून १३ वा महिना शोधून काढला आहे.
यामागे एक ‘दिव्य’ अंकशास्त्रीय गुपित दडलंय! 2+8=10. आणि हा ‘१०’ आकडा म्हणजे काय? तर सामान्य माणसाच्या खिशाला ‘दहा’ ठिकाणाहून कात्री लावणे! “या अंकशास्त्रामुळे कंपन्या झाल्या ‘मालामाल’ आणि माझी सामान्य जनता मात्र होऊ लागली ‘कंगाल’!” वर्षाचे उरलेले दोन-दोन दिवस चोरून एका पूर्ण रिचार्जचा डल्ला मारणाऱ्या या कंपन्यांना ‘गणितातले नोबेल’ द्यायला हवे, पण ते ‘लुटमारी’च्या गटातून!
इनकमिंग बंद… श्वासही बंद करणार का.?
रिचार्ज संपला की काही तासांतच ‘इनकमिंग’ सेवा आणि ‘SMS’ बंद होतात. अहो, माणसाचा श्वास थांबला तरी शरीर काही वेळ उबदार असतं, पण रिचार्ज संपला की तुमचा फोन मृत घोषित केला जातो. “तुमचा बॅलन्स संपला आहे,” हे सांगताना त्या पलीकडच्या बाईचा आवाज किती गोड असतो! जणू काही ती गोड गळा आवळून सांगतेय की, “बाळा, आता पैसे ओत नाहीतर तुझा जगाशी संपर्क तोडला जाईल.” स्वस्त प्लॅन्स तर असे गायब झाले आहेत जसे निवडणुकीनंतर दिलेली आश्वासनं गायब होतात!
जागते राहा, नाहीतर नागवे व्हाल.!
ज्या भगिनीने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे, तिचे आम्हाला मनापासून कौतुक वाटते. तिचा आवाज केवळ शब्द नाहीत, ती आजच्या सामान्य माणसाची ‘किंकाळी’ आहे. आपण जर आताच जागरूक झालो नाही, तर उद्या हे लोक ‘फोन उचलायचे ५ रुपये’ आणि ‘स्क्रीन बघायचे १० रुपये’ लावायलाही मागेपुढे बघणार नाहीत. “अति तिथे माती” असं आपण म्हणतो, पण इथे तर “अति तिथे रिचार्ज” अशी परिस्थिती झाली आहे.
आमचा सवाल आहे : या कंपन्यांचे मालक कुबेराच्या घरात राहतात आणि माझा शेतकरी, कष्टकरी बाप मात्र १०० रुपयांच्या रिचार्जसाठी दोनदा विचार करतो. ही कसली प्रगती? हा तर आधुनिक ‘डिजिटल दरोडा’ आहे! २८ हा आकडा यांच्यासाठी ‘लकी’ असेल, पण सामान्य जनतेसाठी तो ‘पाकीटमारीचा’ मुहूर्त ठरला आहे.
लक्षात ठेवा, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये… पण जर जनता पेटून उठली, तर या कंपन्यांनाही झुकावं लागेल! प्लॅन निवडताना शंभर वेळा तुलना करा, जिथे लूट कमी तिथे जा आणि महत्त्वाचे म्हणजे—तुमचा आवाज बुलंद ठेवा. कारण आवाज दाबला की लूट सुरू होते आणि सामान्य माणूस कंगाल होतो!


























