राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीसाठी विक्रमी गर्दी; १४५ जागांसाठी २६० अर्ज दाखल!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षही मैदानात; अर्ज मागवण्यास सुरुवात
पुणे: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सर्वात आधी उमेदवारी अर्जांचे वाटप सुरू करून निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. पक्षाला उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, त्यांच्याकडे आतापर्यंत १४५ जागांसाठी तब्बल २६० अर्ज प्राप्त झाले आहेत.
पक्षश्रेष्ठींकडून प्राप्त माहितीनुसार, इच्छुक उमेदवारांनी मोठ्या उत्साहाने अर्ज दाखल केले आहेत. अनेक जागांवर एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने, पक्षासमोर योग्य उमेदवारांची निवड करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
शुल्काचा तपशील: पक्षाने अर्जासोबत आकारलेले शुल्क खालीलप्रमाणे आहे:
खुल्या गटासाठी: ₹१०,०००
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी: ₹७,०००
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडूनही अर्ज मागवले
महाविकास आघाडीतील आणखी एक महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाने इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून, लवकरच त्यांच्याकडेही मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांनी अर्ज प्रक्रिया सुरू केल्याने, महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असली तरी, इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षांतर्गत स्पर्धा वाढणार असल्याचे चित्र आहे.






























