भाजप म्हणजे ‘उसवारीचा’ पक्ष; राज्यातील सर्वात दुबळ्या पैलवानाचा सपकाळांनी काढला पंचनामा!
पुण्याच्या मातीत काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला!
पुणे हे विद्येचे माहेरघर आणि संस्कृतीचे लेणे! पण आज या पुण्यनगरीला कुणाची दृष्ट लागली? या शहरात आज ‘ड्रग्स’चा धूर उडतोय आणि ‘कोयत्यांचा’ खणखणाट ऐकू येतोय! हे चित्र पाहून अत्र्यांच्या भाषेत सांगायचे तर— ‘शिवबाच्या महाराष्ट्रात आज सत्तेचे सौदागर माजले आहेत!’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत भाजप आणि महायुतीच्या लक्तरांचा असा काही ‘पंचनामा’ केला, की सत्ताधाऱ्यांना आता झोप लागणे कठीण आहे!
भाजप: उसवारीवर चाललेला दुबळा पैलवान!
सपकाळ कडाडले, “भाजप हा आज राज्यातील सर्वात दुबळा पक्ष झाला आहे!” ज्यांना स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढता येत नाही, ज्यांना दुसऱ्यांच्या घरचे उमेदवार ‘आयात’ करून आखाड्यात उतरावे लागते, त्यांना कसले आलेत मर्दानगीचे दाखले? हा पक्ष आता स्वतःच्या पायावर नाही, तर ‘उसवारीवर’ उभा आहे. निवडणूक आयोग तर जणू सत्ताधाऱ्यांच्या खिशात बसला आहे. मतदार याद्यांचा घोळ म्हणजे लोकशाहीचा खूनच आहे!
सत्तेचे ‘गोचीड’ आणि नूरा कुस्ती..!
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना सपकाळ यांनी शब्दांचे असे काही चाबूक ओढले की विचारू नका! रोज भाजपवर टीका करायची आणि पुन्हा सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहायचे… हे वागणे म्हणजे ‘गोचीडा’ सारखे झाले! “अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि फडणवीस गप्प बसतात, ही कसली युती? ही तर चक्क ‘नूरा कुस्ती’ सुरू आहे!” अशा शब्दांत त्यांनी या ‘सोयीच्या राजकारणा’चे वाभाडे काढले.
पुण्याचे वाटोळे कुणी केले?
मुंढवा जमीन प्रकरण असो वा जैन बोर्डिंगची जमीन, सत्तेचा वापर करून शहराचा लिलाव मांडला आहे. पुणे मेट्रो आणि बससेवा मोफत देण्याच्या गप्पा मारणाऱ्यांच्या घोषणा म्हणजे नुसतेच ‘हवेतील इमले’ आहेत! लाडक्या बहिणीला फसवले, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आणि दोन कोटी रोजगारांचे गाजर तर आता सडले आहे, अशी तोफच त्यांनी डागली.
शेवटचा प्रहार: नार्को टेस्ट करा!
राज्यात गुंडगिरी फोफावली आहे. ज्यांच्या हातावर रक्ताचे डाग आहेत, त्यांना उमेदवारीची माळ घातली जात आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले असून, “राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या या नेत्यांची नार्को टेस्ट करा,” अशी खळबळजनक मागणीही सपकाळ यांनी केली.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार मोहन जोशी, दीप्ती चौधरी आणि अभय छाजेड यांचीही उपस्थिती होती.


























