कलम १५५ की मालकी हक्क फिरवण्याचे ‘जादूई मशीन’? 


अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांचा ‘रुद्रावतार’; महसूल विभागातील ‘पांढरपेशी दरोडेखोरांवर’ आता शिस्तभंगाची कुऱ्हाड!

पुणे |  महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील ‘कलम १५५’ म्हणजे जणू काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हातातील ‘अलाउद्दीनचा दिवा’ झाला आहे की काय, असा संतापजनक प्रश्न आज उपस्थित होत आहे. ज्या कलमाचा जन्म केवळ टंकलेखनातील चुका किंवा अनवधानाने झालेल्या लेखी प्रमादांच्या दुरुस्तीसाठी झाला, त्या कलमाचा वापर करून जमिनीचे मालकी हक्क, क्षेत्र आणि धारणाप्रकार परस्पर बदलण्याचे जे ‘काळे धंदे’ जिल्ह्यात सुरू आहेत, त्यावर अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी आता आपला जळजळीत हंटर उगारला आहे!

कायद्याचा खून आणि प्रशासकीय अनाचार मुळात कायद्याचा हेतू स्पष्ट आहे—एखादी वेलांटी चुकली, काना राहिला किंवा आकड्यांची जुळवाजुळव करताना नजरचूक झाली, तर ती सुधारावी. पण पुण्याच्या महसूल दरबारी बसलेल्या काही ‘कलेक्टर-छाप’ शहाण्यांनी या कलमालाच मालकी हक्क बदलण्याचे ‘जादूई मशीन’ बनवून टाकले आहे. रात्रीतून सातबाऱ्यावरील नावे बदलणे, क्षेत्रात फेरफार करणे आणि मूळ मालकाला वाऱ्यावर सोडण्याचे हे जे प्रकार निदर्शनास आले आहेत, तो निव्वळ अनवधानाने झालेला प्रकार नसून, तो जाणीवपूर्वक केलेला कायद्याचा खून आहे!

दोषींची आता खैर नाही!

अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी या गंभीर प्रकरणाची केवळ दखलच घेतली नाही, तर अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि यात सामील असलेल्या दोषींवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनातील या ‘दीमका’प्रमाणे पोखरणाऱ्या प्रवृत्तींना आता सळो की पळो करून सोडण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.

“ज्यांनी ज्यांनी लेखणीचा गैरवापर करून सामान्य जनतेच्या जमिनीशी खेळ मांडला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल. शासन सामान्यांच्या हक्कासाठी आहे, भ्रष्टाचाऱ्यांच्या मलिद्यासाठी नाही!” असा जणू सज्जड दमच राऊत यांनी भरला आहे.

आमचा सवाल आहे…

लेखणीच्या एका फटक्यात गरिबांची जमीन श्रीमंतांच्या घशात घालणाऱ्या या महाभागांना पाठीशी घालणारे ‘गॉडफादर’ कोण आहेत? सतीश राऊत यांनी उगारलेला हा हंटर आता किती जणांची कातडी सोलून काढणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भ्रष्टाचाऱ्यांनो, आता तुमचे ‘जादूई मशीन’ बंद पडणार आहे, कारण नियतीचा न्याय आता तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला आहे!

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!