विशेष लेख : सामान्य माणूस म्हणजे काय तुमची ‘दुभती गाय’ वाटली काय? टोलधाड तात्काळ बंद करा !


विशेष लेख : सामान्य माणूस म्हणजे काय तुमची ‘दुभती गाय’ वाटली काय? टोलधाड तात्काळ बंद करा!

आज महाराष्ट्राच्या मातीतून, सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यातून आणि मुंबई-पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून एकच जळजळीत आवाज घुमतोय—”सामान्य माणसाची ही टोललूट आता थांबवा!” हा केवळ आक्रोश नाही, तर ही या राज्याच्या खऱ्या मालकाची, म्हणजे जनतेची गर्जना आहे. आज प्रत्येक चौकात, प्रत्येक चहाच्या टपरीवर आणि प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या घरातून ही जोरदार मागणी होत आहे की, टोलचा हा फास फक्त व्यावसायिक वाहनांच्या गळ्यात टाका, सामान्य जनतेला यातून मुक्त करा!

हा रस्ता कुणाच्या बापाचा..?

अहो सरकार, रस्ते बांधले म्हणजे तुम्ही जनतेवर उपकार केले नाहीत. हा रस्ता, ही माती आणि यावरची खडी या देशातल्या कष्टकऱ्याच्या पैशातून उभी राहिली आहे. गाडी घेताना ‘रोड टॅक्स’च्या नावाखाली तुम्ही आधीच आमची चामडी सोलून काढता, पेट्रोलच्या प्रत्येक थेंबावर टॅक्स वसूल करता; मग पुन्हा त्याच रस्त्यावरून जाण्यासाठी टोलची ही ‘अधिकृत खंडणी’ कशासाठी? सामान्य माणूस काय तुमची ‘दुभती गाय’ आहे, की जेव्हा वाटेल तेव्हा जिची धार काढून तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भराव्यात?

व्यापारी गाड्यांना लावा, सामान्यांना सोडा.!

आमची मागणी स्पष्ट आणि रोखठोक आहे—जे व्यावसायिक आहेत, जे ट्रक, कंटेनर आणि लक्झरी बसच्या माध्यमातून नफा कमावतात, त्यांच्याकडून टोल घ्या, आमची ना नाही. तो त्यांच्या धंद्याचा भाग आहे. पण कुटुंबाला घेऊन निघालेला पगारदार माणूस, दवाखान्याला निघालेला वृद्ध किंवा साध्या चारचाकीतून प्रवास करणारा शेतकरी, यांच्या खिशात हात घालताना तुम्हाला शरम कशी वाटत नाही? त्यांच्यासाठी रस्ता ही ‘सुविधा’ नाही, तर जगण्याची ‘गरज’ आहे. पण तुमच्या या राजवटीत जनतेची लूट करणे हाच जणू नवा ‘राजधर्म’ झाला आहे!

खड्ड्यांचे साम्राज्य आणि टोलची सक्ती!

टोलनाक्यावर पैसे वसूल करण्यासाठी तुमचे बाऊन्सर आणि तुमची यंत्रणा एखाद्या वाघासारखी टपलेली असते. पण त्याच रस्त्यावर जेव्हा पावसाळ्यात समुद्रासारखे खड्डे पडतात, तेव्हा तुमचे मंत्री आणि भ्रष्ट ठेकेदार कोणत्या बिळात जाऊन लपतात? कमरेची हाडं मोडून देणारे रस्ते द्यायचे आणि वरून ‘देशाचा विकास’ झाल्याच्या गप्पा मारायच्या, हा निव्वळ दांभिकपणा आहे. हा विकास नसून सामान्यांच्या रक्तावर पोसलेली ‘ठेकेदार कल्याण योजना’ आहे!

जनतेचा रेटा आता थांबणार नाही !

आज संपूर्ण महाराष्ट्रातून ही जोरदार मागणी होत आहे आणि सरकारने ती ऐकलीच पाहिजे. लक्षात ठेवा, जनतेचा हा संताप उद्या वणवा बनून तुमच्या टोलनाक्यांना वेढा घातल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीच्या वेळी ‘मायबाप जनता’ म्हणणारे तुमचे ओठ, सत्तेवर आल्यावर याच जनतेचे रक्त शोषायला मागे-पुढे पाहत नाहीत, हे आता उघड झाले आहे.

आमचा  इशारा..!

आम्ही ठणकावून सांगतो, सामान्य माणसाच्या वाहनांना टोलमधून तात्काळ मुक्ती द्या! हा महाराष्ट्र अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शिवरायांचा आहे. इथली जनता तोपर्यंतच शांत असते, जोपर्यंत तिचा स्वाभिमान डिवचला जात नाही. आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. टोलधाड थांबवा, अन्यथा जनता स्वतःचे रस्ते स्वतः मुक्त केल्याशिवाय राहणार नाही!

सांगा या करबहाद्दर सरकारला—जर रस्ते लोकांचे आहेत, तर त्यावर ही लूट कशासाठी? उठा, संघटित व्हा आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा!

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!