देहूरोड पोलिसांचा ‘दे धडक’ दणका ; दुचाकीचोरांची टोळी गजाआड!
अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या ; ६ गुन्हे उघड, रिक्षासह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
( प्रतिनिधी कडून)
देहूरोड: पुणे-पिंपरी चिंचवडच्या परिसरात दुचाकी चोरांनी जो उच्छाद मांडला होता, त्याला देहूरोडच्या रणमर्दानं अखेर लगाम घातला आहे! “चोराच्या उलट्या काळजा”चा शोध घेत, देहूरोड पोलिसांनी अट्टल चोरट्यांच्या टोळीला शिताफीने जेरबंद करून त्यांच्या ‘फॅन्सी’ दुनियेचा पार पंचनामा केला आहे. पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला मान देत, तपास पथकाने केलेल्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांचे पार धाबे दणाणले आहेत!
कसा लागला छडा..?
२७ जानेवारीचा तो दिवस! देहूगाव परिसरात पोलीस गस्त घालत असताना एका विना-नंबरच्या दुचाकीवर स्वार झालेला ईश्वर संदीप गजे हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी ‘खाकी’चा इंगा दाखवताच त्याचा साळसूदपणा गळून पडला आणि त्याने चोरीची कबुली दिली. पण हा तर केवळ हिमनगाचे टोक होते!
टोळीचा पर्दाफाश..!
पोलिसी खाक्या मिळताच ईश्वरने आपल्या साथीदारांची नावे ओकली. अनिकेत ऊर्फ छोट्या संतोष विटकर आणि आयरन ऊर्फ एस.पी. आनंदा राऊत या आपल्या पंटर मित्रांसह तो ही टोळी चालवत होता. पोलिसांनी या दोघांनाही उचलले आणि त्यांच्याकडून केवळ दुचाकीच नव्हे, तर चक्क एक रिक्षाही हस्तगत केली.
उघडकीस आलेले गुन्हे :
देहूरोड पोलीस स्टेशन: २ गुन्हे
दिघी पोलीस स्टेशन: २ गुन्हे
सिंहगड रोड पोलीस ठाणे: १ गुन्हा
खडक पोलीस स्टेशन : १ गुन्हा एकूण ६ गुन्हे उघडकीस आले असून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गुन्हेगारीचा ‘रेकॉर्ड’ मोठा..!
हे पकडलेले आरोपी काही साधेसुधे ‘पाकीटमार’ नाहीत! ‘छोट्या’ विटकरवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न (३०७) आणि आर्म ॲक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर एस.पी. राऊतवरही आळंदी पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंद आहे. या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
शाबास पोलीस अधिकारी..!
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शशिकांत महावरकर, सारंग आव्हाड, बसवराज तेली आणि उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पीएसआय प्रल्हाद डोंगळे, लखनकुमार वाव्हळे व त्यांच्या बहादूर सहकाऱ्यांनी ही ‘धुलाई’ मोहीम फत्ते केली.
आमचा सवाल: ‘साहब, ही तर फक्त सुरुवात आहे! शहरात मोकाट फिरणाऱ्या प्रत्येक गुंडाला आता देहूरोड पोलिसांच्या या तडाख्याची धास्ती वाटलीच पाहिजे!’


























