पुणेकरांच्या रक्तावर पालिकेचे वाढीव १० टक्क्यांचे ताव ; ‘आम आदमी पार्टी’चा महापालिकेवर तुफानी एल्गार !
पुणे महानगरपालिकेच्या सत्ताधीशांनी आणि आयुक्तांनी मिळून पुणेकरांच्या उरावर करवाढीचे जे १० टक्क्यांचे धोंडे मारण्याचे कारस्थान रचले आहे, त्याविरुद्ध आज पुण्यातील वातावरण चांगलेच तापले. “५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना पूर्ण करमाफी देऊ” असे सोज्वळ आश्वासन देऊन सत्तेची उब घेणाऱ्यांनी आता पुणेकरांच्या विश्वासाचाच लिलाव मांडला आहे की काय, असा संतप्त सवाल विचारत आम आदमी पार्टीने आज पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली.
॥ पालिकेचा पंचनामा ॥
१. ७७०० कोटी रुपये: बड्या थकबाकीदारांकडे असलेली रक्कम (जी वसूल करण्याची पालिकेची हिंमत होत नाही!) २. ६०० कोटी रुपये: गेल्या वर्षीच्या वसुलीतील तूट (प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा नमुना!) ३. १० टक्के वाढ: प्रामाणिक पुणेकरांच्या खिशावर मारलेला हा तर उघड दरोडा! ४. ५०० फुटी घरांना करमाफी: सत्तेत बसण्यापूर्वी दिलेले ‘ते’ खोटे आश्वासन!
थकबाकीदारांच्या उरावर बसण्याऐवजी सामान्य पुणेकरांचे रक्त पिणे, हाच का तुमचा विकास?
‘थकीत ७७०० कोटी वसूल करा, मगच बोला!’ एकीकडे सामान्य पुणेकर महागाईच्या वणव्यात होरपळत असताना, दुसरीकडे पालिकेचा अजब कारभार सुरू आहे. प्रशासनाने गेल्या वर्षी २८०० कोटींच्या वसुलीचे गाजर दाखवले, पण पदरात पडले फक्त २२०० कोटी! मग उर्वरित ६०० कोटी कोणाच्या खिशात मुरले? आणि त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, ज्या बड्या धेंडांकडे ७७०० कोटींची थकबाकी आहे, त्यांच्या गळ्याला नख लावण्याचे धाडस प्रशासन दाखवत नाही. मग या भ्रष्ट अकार्यक्षमतेचे ओझे प्रामाणिक करदात्यांनीच का वाहायचे? हा अन्याय कशासाठी? असा सडेतोड प्रश्न ‘आप’चे मुकुंद किर्दत यांनी यावेळी उपस्थित केला.
आश्वासनांची खैरात अन् पुणेकरांची दैना !
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी पक्षाने ५०० स्क्वेअर फुटांच्या घरांना पूर्ण करमाफीचे गाजर दाखवले होते. आता त्या आश्वासनाचे काय झाले? ती आश्वासने म्हणजे केवळ निवडणुकीच्या तोंडावर उडवलेली हवेतील रंगीत कारंजी होती का? पुणेकरांना रस्ते धड नाहीत, पाणी वेळेवर नाही, कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही, मग ही लूट कोणत्या तोंडाने करता? असा सवाल आंदोलकांनी केला.
आयुक्तांना निवेदनाचे ‘डोस’ !
आंदोलनानंतर आयुक्त नवल किशोर राम यांना मागण्यांचे खरमरीत निवेदन देण्यात आले. या आंदोलनात मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, शंकर थोरात, अक्षय शिंदे, सुभाष कारंडे, सुनील सवादी, कुमार धोंगडे, सतीश यादव, सचिन आल्हाट, हरिदास भिसे, वैष्णवी अवचिते, गजानन भोसले, गुणाजी मोरे, शाईन आत्तार, मुकेश गायकवाड, अविनाश भाकरे, अनिल धुमाळ, ऋषिकेश मारणे, श्रीकांत भिसे, शितल कांडेलकर, सुरज सोनवणे, तगतसिंग तवर, अँन अनिश, सागर झा, संजय कोणे, फेबियन सॅमसंग, अरुण केदारी, संतोष काळे, प्रशांत कांबळे, निखिल खंदारे, निलेश रावडे आदी कार्यकर्त्यांनी पालिकेचा परिसर “करवाढ रद्द करा” अशा घोषणांनी दणाणून सोडला.
आता पाहूया, पुणेकरांच्या खिशाला चाट लावण्याचे हे कारस्थान पालिका प्रशासन थांबवते की ‘आश्वासनं पाळणं’ ही गोष्ट फक्त पांढऱ्यावर काळं करण्यापुरतीच उरते!




























