रस्ता सुरक्षिततेचा ‘महाकुंभ’ आणि उत्साहाचा ‘घोडावत’ धबधबा!
शहापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम; नियमांच्या पालनासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार!
इचलकरंजी : प्रतिनिधी
रस्त्यावरचा प्रवास हा यमराजाच्या दरबारात जाणारा मार्ग ठरू नये, तर तो सुखकर आणि सुरक्षित असावा, यासाठी शहापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कंबर कसली आणि त्याचेच भव्य फलित म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान २०२६! या अभियानाचा सांगता समारंभ म्हणजे जणू शिस्तीचा आणि उत्साहाचा एक सोहळाच ठरला. संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात हा कार्यक्रम जेव्हा पार पडला, तेव्हा तेथील वातावरणात ‘रस्ता सुरक्षा, हाच आमचा ध्यास’ हीच गर्जना घुमत होती.

मान्यवरांचा प्रेरणेचा डोस! कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक आणि शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवणारे संजयजी घोडावत होते. आपल्या शैलीत मार्गदर्शन करताना त्यांनी शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी विद्यार्थ्यांना रस्ते नियमांची केवळ माहितीच दिली नाही, तर ती जीवनात कशी उतरवावी, याचे जणू बाळकडूच पाजले.

नुसती चर्चा नाही, तर थेट कृती! हे अभियान म्हणजे केवळ भाषणांची जत्रा नव्हती. इचलकरंजीच्या गल्लीबोळातून निघालेल्या रॅलीने लोकांच्या झोपलेल्या जाणिवांना जागे केले. रोटरी क्लबमध्ये जेव्हा चित्रकला, निबंध आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा रंगल्या, तेव्हा मुलांच्या कल्पनाशक्तीतून सुरक्षिततेचे ‘रंग’ आणि ‘शब्द’ उमटले.
केवळ विद्यार्थ्यांवरच लक्ष केंद्रित न करता, शहराची वाहतूक सांभाळणाऱ्या रिक्षाचालक, अवजड वाहन चालक आणि चिमुकल्यांना शाळेत नेणाऱ्या स्कूल बस ड्रायव्हर्ससाठी ‘आरोग्य तपासणी शिबिर’ भरवून आरटीओ प्रशासनाने खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले.
सेवाभावी संस्थांचा आणि ‘जीवनदूतांचा’ गौरव अपघाताच्या वेळी देवदूत बनून धावून जाणाऱ्या ‘जीवनदूतांचा’ यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. रोटरी, लायन्स, मारवाडी युवा मंच, आणि विविध वाहन चालक संघटनांच्या प्रतिनिधींना जेव्हा मान्यवरांच्या हस्ते मोमेंटो आणि प्रमाणपत्रे देण्यात आली, तेव्हा सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
या दिमाखदार सोहळ्याला सहायक आरटीओ अंकिता वांढेकर, विनायक भोसले, डॉ. विराट गिरी यांच्यासह आरटीओ विभागाचे सर्व अधिकारी आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
थोडक्यात काय, तर शहापूर आरटीओने रस्ता सुरक्षेचा जो मंत्र इचलकरंजीच्या मातीत पेरला आहे, त्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही!


























