‘आमदार लांडगेंची मुक्ताफळे की विषफळे?’; पिंपरी-चिंचवडच्या रणांगणात संतापाचा वणवा!
पुणे/पिंपरी : युनुस खतीब
भोसरीचे भाग्यविधाते म्हणवून घेणाऱ्या आमदार महेश लांडगे यांनी अहिल्यानगरच्या भूमीवर जाऊन जे काही ‘पांडित्य’ पाजळले आहे, त्याचे पडसाद आता पिंपरी-चिंचवडच्या गल्लीबोळांत उमटू लागले आहेत! ज्या तोंडाने विकासाच्या गप्पा मारायच्या, त्याच तोंडाने समाजा-समाजात विष पेरण्याचे काम लोकप्रतिनिधी करू लागले की, लोकशाहीच्या चिंध्या झाल्याच म्हणून समजा! लांडगे यांच्या त्या विखारी विधानामुळे मुस्लिम समाज आता पेटून उठला असून, ‘आमदारांना बेड्या ठोका’ असा गर्जनांचा पाऊस आज पिंपरीत पडला.
पोलीस सुस्त, जनता त्रस्त!
दोन दिवसांपूर्वी सकल हिंदू समाजाच्या मोर्चात आमदारांची जीभ काय घसरली, जणू काही द्वेषाचा महापूरच आला! हे विधान म्हणजे निव्वळ ‘हेट स्पीच’चा नमुना. पण आमचे पोलीस तरी कसले? गुन्हेगाराला शोधायला यांना मुहूर्त लागतो आणि सत्ताधारी आमदार असला की मग तर यांना ‘सुओ मोटो’ शब्दाचा विसरच पडतो! ४८ तास उलटले, तरी पोलिसांच्या लेखणीला अद्याप शाई फुटलेली नाही, हीच तर या लोकशाहीची शोकांतिका आहे.
आता तक्रारींचा पाऊस पडणार!
पोलिसांनी डोळ्यांना पट्टी बांधली असली, तरी जनता जागी आहे. आज पिंपरीत झालेल्या बैठकीत राहुल डंबाळे, फजल भाई शेख, शाहाबुद्दीन शेख आणि इतर मर्दांनी मिळून रणशिंग फुंकले आहे. “जर कायदा झोपला असेल, तर त्याला जागे करण्याची ताकद आमच्यात आहे,” असा जणू इशाराच या बैठकीतून देण्यात आला. उद्यापासून शहरातील २५ पोलीस ठाण्यांत तक्रारींचे ढिगारे साचणार आहेत.
लोकप्रतिनिधीने जनतेला जोडायचे असते, तोडायचे नसते. पण सत्तेची ऊब चढली की अनेकांना इतिहासाचा विसर पडतो आणि वर्तमानातील शांतता खुपू लागते. लांडगे साहेब, लक्षात ठेवा, द्वेषाच्या पायावर उभारलेले राजकारण वाळूच्या किल्ल्यासारखे कोसळायला वेळ लागत नाही!
आता चेंडू पोलिसांच्या कोर्टात आहे. खाकी वर्दी आपली कर्तव्यनिष्ठा जपते की सत्तेच्या दावणीला बांधली जाते, हे येणारा काळच ठरवेल. पण एक मात्र नक्की, पिंपरी-चिंचवडची ही शांतता आता आंदोलनाच्या वादळापूर्वीची शांतता आहे!


























