अग्रलेख: खाद्य सुरक्षा की यमराजाची निमंत्रण पत्रिका?


अग्रलेख: खाद्य सुरक्षा की यमराजाची निमंत्रण पत्रिका?

मरण स्वस्त आणि जगणं महाग” असं आजवर आम्ही म्हणत आलो, पण आता “अन्न विषारी आणि मरण सरकारी” अशी नवी व्याख्या करण्याची वेळ आली आहे! तरुण खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत जो शब्दरूपी बॉम्ब टाकला आहे, त्यानं सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या हलल्या की नाही माहीत नाही, पण सामान्य माणसाच्या ताटातलं जेवण मात्र नक्कीच थरथरलं असेल!

 मसाल्यांचा बाजार की मृत्यूचा महापूर?

अहो, आज बाजारात फिरायला निघालात की डोळे पांढरे व्हायची वेळ येते! मटण मसाला, चिकन मसाला, वांगी मसाला, पुलाव मसाला, बिर्याणी मसाला, अंडकारी मसाला, आणि त्या मुंबईच्या प्रसिद्ध पावभाजीचा मसाला… बापरे! इतके मसाले की जणू काही निसर्गाने चव विसरली आणि या कंपन्यांनी ती पाकिटात बंद करून आणली!

आजच्या सुशिक्षित आणि आधुनिक गृहिणींनाही हेच चकचकीत पाकिटातले मसाले आवडू लागले आहेत. अहो, पूर्वीच्या काळी आमच्या आया-बहिणी उन्हाळ्यात पाटा-वरवंटा घेऊन घामाघूम व्हायच्या, पण वर्षभराचा मसाला स्वतःच्या हाताने निवडायच्या. आज काय आहे? पाकिटावर त्या नटीचा हसरा फोटो बघितला की गृहिणींना वाटतं, “वा! काय चव आहे!” पण त्या पाकिटात ‘चव’ नाही, तर ‘कॅन्सरची पूड’ दडलेली आहे, हे ओळखायचं कुणी?

नशीब अजून ‘श्रीखंड मसाला’ किंवा ‘बासुंदी मसाला’ बाजारात आलेला नाही, नाहीतर या नफेखोर कंपन्यांनी दुधातही लाकडाचा भुसा कालवून आम्हाला ‘शुद्ध मराठमोळा स्वाद’ चाखायला लावला असता!

 परदेशातलं विष, आमच्या ताटात कसं?

राघव चड्ढा म्हणतात तसं, जे मसाले आणि खाद्यपदार्थ लंडन-अमेरिकेतल्या कुत्र्यांना घालायलाही तिथली सरकारं परवानगी देत नाहीत, कारण त्यात मृत्यूचा विळखा दडलेला आहे; तेच मसाले इथल्या दुकानांत ‘बाय वन गेट वन फ्री’ म्हणून विकले जात आहेत. काय आमची माणसं म्हणजे काय प्रयोगासाठी वापरले जाणारे उंदीर आहेत काय? तिकडच्या मांजरांना जो कॅन्सर होऊ शकतो, तो आमच्या भारतीयांना ‘बोनस’ म्हणून वाटला जातोय, हा कसला न्याय?

 FSSAI: सरकारी पांढरा हत्ती!

राघव म्हणतात, FSSAI ला ताकद द्या, त्यांना आधुनिक प्रयोगशाळा द्या. पण आमचं म्हणणं असं आहे की, या संस्थेला आधी ‘प्रामाणिकपणाचे’ डोस द्या! मोठ्या कंपन्यांचे हप्ते खिशात खुळखुळले की, या बाबूंच्या डोळ्यांवर ‘भ्रष्टाचाराचा’ चश्मा चढतो. मसाल्यात विटेची पूड मिसळली काय किंवा घातक रसायनं, यांना त्यात ‘चविष्ट पदार्थ’च दिसतात! जर ही संस्था सामान्य माणसाच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपन्यांना पाठीशी घालत असेल, तर ही ‘खाद्य सुरक्षा’ नसून ‘यमराजाची निमंत्रण पत्रिका’ आहे! 

तुम्हाला डिजिटल इंडिया हवाय, तुम्हाला पाच ट्रिलियनची इकॉनॉमी हवीय, पण हे सगळं कोणासाठी? जर तुमची जनताच या ‘तयार मसाल्यांच्या’ नादात कॅन्सरच्या विळख्यात अडकून तडफडून मरणार असेल, तर त्या प्रगतीला काय चाटायचं आहे?

राघव चड्ढा, तुम्ही आज योग्य वेळी योग्य घंटा वाजवली आहे. पण आमची गृहिणींनाही विनंती आहे – त्या चकचकीत पाकिटांच्या जाळ्यात फसू नका! अन्नात विष कालवणाऱ्या या नफेखोर कंपन्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

लक्षात ठेवा, ताटातलं अन्न खाण्यापूर्वी दहावेळा विचार करा, कारण समोर वाढलेलं ताट हे जेवण आहे की मृत्यूचं आमंत्रण, हे सांगणारा आता कुणी उरला नाही!

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!