गॅसच्या कमतरतेमुळे आता पाईप येणार आणि जिथे काहीच नाही तिथे राॅकेलचा धूर निघणार!


गॅसच्या कमतरतेमुळे आता पाईप येणार आणि जिथे काहीच नाही तिथे राॅकेलचा धूर निघणार!

आज दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या बड्या मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक जंगी बैठक पार पडली. बैठकीला मनोहरलाल खट्टर, हरदीप सिंग पुरी आणि प्रल्हाद जोशी यांसारखे दिग्गज उपस्थित होते. पण या सगळ्या गर्दीत आमचे छगनराव भुजबळ यांनी जो काही ‘साक्षात्कार’ जगासमोर मांडलाय, तो ऐकून सामान्य गृहिणीच्या हातातील उलथणं गळून पडलं नाही तरच नवल!

भुजबळ साहेब म्हणतात की, केंद्र सरकारच्या एका पत्रकानुसार पुढील तीन महिन्यांत एलपीजी गॅसचा पुरवठा काहीसा मंदावण्याची किंवा चक्क बंद होण्याची शक्यता आहे. आता सांगा, गॅस गेला तर पेटवायचं काय? चूल पेटवायची म्हटली तर शहरात लाकडं शोधायला आता बागेत जायचं का? गॅस सिलिंडर म्हणजे आता जणू काही दुर्मिळ होत चाललेली वस्तू ठरणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे.

यावर सरकारने एक उपाय शोधलाय, तो म्हणजे पीएनजी (पाईप नॅचरल गॅस). आता सरकारला वाटतंय की, एलपीजीपेक्षा ‘पीएनजी’ वापरणं जास्त सोयीचं आणि स्वस्त आहे. भुजबळ साहेब म्हणतात, जसं पाणी आणि वीज घराला लागते, तसा आता गॅसचा पाईपही इमारतींना अनिवार्य करायला हवा. आणि विशेष म्हणजे, यासाठीच्या परवानग्या चक्क २४ तासांत मिळणार! ज्या देशात साध्या अर्जावर सही मिळायला आठवडा जातो, तिथे २४ तासांत परवानगी? हा म्हणजे गतीने प्रगती करण्याचा एक ‘विक्रमी’ प्रयत्नच म्हणावा लागेल!

पण सर्वात मार्मिक गोष्ट पुढेच आहे. जर गॅस मिळाला नाही, तर भुजबळ साहेबांनी एक ‘अस्सल’ मार्ग सुचवलाय—केरोसीन!

 रॉकेलचे ‘अच्छे दिन’!

आपलं जुनं-जाणतं राॅकेल! ज्या राॅकेलला आपण केव्हाच निरोप दिला होता, त्याला आता पुन्हा सन्मानाने पेट्रोल पंपावर आणलं जाणार आहे. साडेतीन हजार लिटर केरोसीन साठा राज्यात सज्ज आहे म्हणे! म्हणजे पुन्हा एकदा ती चिमणी, तो उग्र वास आणि ते काजळी धरलेलं पातं! प्रगतीचं चक्र थोडं मागे फिरवून आपण पुन्हा एकदा ‘राॅकेल युगा’त डोकावणार आहोत की काय, असं वाटतं.

सरकार म्हणतंय, पर्यायी व्यवस्था करू. आम्ही म्हणतो, व्यवस्था करा पण ती सर्वसामान्यांना सहज झेपेल अशी करा. नाहीतर उद्या लोक गॅसच्या रिकाम्या टाकीकडे बघून “पुढच्या महिन्यात लवकर ये” अशी प्रार्थना करत बसतील! थोडक्यात काय, तर गॅसच्या कमतरतेमुळे आता पाईप येणार आणि जिथे काहीच नाही तिथे राॅकेलचा धूर निघणार. आता गृहिणींनी थोडा धीर धरावा, कारण दिल्लीच्या बैठकीचे पडसाद आता थेट तुमच्या स्वयंपाघरात उमटणार आहेत!

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!