जुन्या वादातून खोतवाडी-तारदाळ परिसरात तुफान राडा; घरात घुसून फायटरने जीवघेणा हल्ला, ६ जणांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी / प्रतिनिधी
जुन्या भांडणाचा मनात राग धरून घरात घुसून फायटरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना खोतवाडी आणि तारदाळ (ता. हातकणंगले) परिसरात शुक्रवारी रात्री घडली. या तुफान राड्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी घरात घुसून दहशत माजवत जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओम सुहास नर्मदे (वय १९, रा. जावाईवाडी, तारदाळ) आणि आरोपी सुजल नलवडे यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केला. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खोतवाडी येथील आरोही परमिट रूम बीअर बारसमोर आरोपींनी फिर्यादीची मोटारसायकल अडवली. आरोपींनी ओम नर्मदे व त्याचा भाऊ गणेश नर्मदे यांना बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. या मारहाणीदरम्यान संशयित आरोपी जय उर्फ मोन्या ओगले याने फायटरने ओम नर्मदेच्या पाठीत वार करून त्याला गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर फिर्यादी ओम हा शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजताच आरोपींकडून धमक्यांचा पाऊस सुरू झाला. जर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीस, तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी थेट जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. एवढेच नव्हे तर, तारदाळ गावच्या सरपंचांचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते रणजीत पवार यांनाही फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलीस तक्रारीचा राग मनात धरून रात्री सुमारे दहाच्या सुमारास आरोपींनी तीन मोटार सायकलींवरून येत थेट फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. घरात अक्षरशः दहशत माजवत आरोपींनी फिर्यादीचे काका सागर नर्मदे आणि मावसभाऊ अजय चौगुले यांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पुन्हा एकदा फायटरचा वापर करून दोघांच्याही डोक्यावर आणि तोंडावर जीवघेणे वार करण्यात आले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची शहापूर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून सुजल नलवडे, जय उर्फ मोन्या ओगले, यश ओगले, हेमंत मुसळे, युवराज उर्फ प्रतिम खांडेकर आणि विजय शिंदे (सर्व राहणार खोतवाडी) या सहा जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून शहापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.


























