फुगेवाडी विषारी दारूकांड: आरोपी कर्नेल विरका सिंगचे घर आणि अवैध दारू अड्डा जमीनदोस्त; महापालिकेचा धडाकेबाज हातोडा


फुगेवाडी विषारी दारूकांड: आरोपी कर्नेल विरका सिंगचे घर आणि अवैध दारू अड्डा जमीनदोस्त; महापालिकेचा धडाकेबाज हातोडा

 पिंपरी : चंद्रशेखर पात्रे :

फुगेवाडी परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली असून, विषारी दारू विक्रीचे केंद्र ठरलेल्या मुख्य आरोपी कर्नेल विरका सिंग याचे अनधिकृत घर आणि दारू अड्डा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जमीनदोस्त केला आहे. गुरुवारी (दि. ४) प्रशासनाने ही धडक कारवाई केली.

**प्रशासनाची कठोर कारवाई**

विषारी दारू विक्रीच्या या अवैध ठिकाणावर महापालिकेने २ जून रोजी नोटीस बजावून संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले होते. २४ तासांच्या आत हे बांधकाम स्वतःहून हटविण्याचे आदेश आरोपीला देण्यात आले होते. मात्र, आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने घरातील साहित्य हलवण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. याची दखल घेत महापालिकेने आज प्रत्यक्ष पाडकाम सुरू करून हे अवैध बांधकाम पूर्णपणे नेस्तनाबूत केले.

**वाढता दबाव आणि मोहिमेचा भाग**

फुगेवाडीतील या घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांवर सर्वस्तरातून मोठा दबाव होता. विरोधकांनी आरोपींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तसेच पोलिसांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर, अवैध दारू व्यवसायाशी संबंधित ठिकाणांवर पोलिसांचा आणि महापालिकेचा धडाका सुरू आहे. कर्नेल सिंग विरका याच्या घरावर केलेली ही कारवाई याच मोहिमेचा एक भाग असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

**अशी पार पडली कारवाई**

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. उप-आयुक्त अण्णा बोदडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ४ ब्रेकर, २ गॅस कटर आणि ४० मजुरांच्या सहाय्याने हे पाडकाम केले.

यावेळी कार्यकारी अभियंता उमेश मोने, उप-अभियंता संदिप पाडवी, महेंद्र देवरे, प्रशांत कोतकर, सुनिल दांगडे, सुनिल हरिदास, सतीश डांगे, अशोक पाटील, वनिता बवले, योगेश शेवलकर, विशाल नेवाळे, सुरेश लंगोटे, कल्याणी वाघमारे, धनश्री हंडे, ज्योती चांदगुडे, प्रीती बिजवे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि २० एमएसएफ जवान उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

#PressMediaLive #PimpriChinchwad #Fugewadi #ActionAgainstCrime #IllegalLiquor #PCMC #PuneNews #JusticeForVictims #AdministrationAction #CrimeNewsMaharashtra


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!