विशेष अग्रलेख: बड्यांची जीभ घसरली की ‘ब्रेकिंग’, अन् सामान्यांची घसरली की नियमांवर बोट..
( मेहबूब सर्जेखान ज्येष्ट संपादक )
आपल्या देशात संविधानाने कलम १९(१)(अ) अंतर्गत विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले असले, तरी कलम १९(२) द्वारे त्यावर संयमाची जोडही दिली आहे. बोलत असताना कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घेणे हीच खऱ्या सुसंस्कृतपणाची आणि सुजाण नागरिकत्वाची पहिली ओळख आहे. पण आजकाल संवादाची गाडी पाहिली की वाटते, लोकांच्या भाषेचा ताबा पार सुटला आहे! बड्या राजकारण्याची किंवा मोठ्या असामीची जीभ घसरली की वृत्तवाहिन्यांवर दिवसभर ‘ब्रेकिंग न्यूज’चा धुमाकूळ चालतो आणि रंगदार चर्चा झडतात; पण तेच सामान्य माणसाची जीभ घसरली की लगेच नियमांवर बोट ठेवले जाते आणि पोलीस ठाण्याचे चक्र मागे लागते! हाच तो उघड फरक आहे, जो प्रत्येक सुजाण नागरिकाने वेळेत ओळखला पाहिजे. घरात सकाळी चहाच्या कपापासून सुरू झालेली चर्चा असो की चौकातील गप्पा, महागाईच्या काळात महिन्याचा खर्च सांभाळताना मिश्कील टोमणे सुरू होतात आणि बघता बघता संवादाची गाडी भलतीकडेच वळते! जमिनीच्या छोट्या तुकड्यावरून आपापसात अशी शाब्दिक कुस्ती रंगते की, वर्षांनुवर्षांचे प्रेम पार बाजूला पडून घरात नवे नाट्य उभे राहते. घरात थोडा गोडवा, संयम आणि दुसऱ्याच्या भावनांचा आदर ठेवला, तर हे छोटे-मोठे कौटुंबिक वाद सहजासहजी शमवता येतात.
दुसऱ्या बाजूला, सामाजिक कामात धावपळ करताना सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. गल्लीतल्या खड्ड्यांवरून वा प्रशासकीय कारभारावर बोलताना वक्त्यांचा उत्साह असा ओसंडून वाहतो की, बोलता बोलता भाषेचा ताबा सुटतो! जोशात वक्त्यांच्या तोंडातून अनवधानाने काहीतरी वेगळेच बाहेर पडते आणि बास… मग काय विचारता? मूळ खड्ड्याचा प्रश्न बाजूला राहतो आणि वक्त्यांच्या तोंडून निघालेल्या त्या एकाच वाक्यावर दिवसभर चौकाचौकांत जनतेची रंगदार चर्चा सुरू होते! गल्लीतल्या पारापासून ते संगणकीय माध्यमांपर्यंत जनता मूळ नागरी प्रश्नाला बाजूला ठेवून त्या वाक्याचाच किस पाडत बसते आणि संवादाची ही कशी घसरण झाली, यावरच चवीने बोलू लागते. त्यामुळे सनदशीर मार्गाने लढताना, कोणाच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही याची खबरदारी घेत वक्त्यांनी आपल्या मुद्द्याचे वजन टिकवण्यासाठी भाषेचा ताबा घट्ट ठेवलेलाच बरा!
सार्वजनिक व्यासपीठांची तर गोष्टच वेगळी! तिथे माईक समोर आला की बोलण्याचा वेग आपोआप दुप्पट होतो. घाईघाईत आणि अतिउत्साहात शब्द बाहेर पडले की, संध्याकाळपर्यंत संगणकीय माध्यमांवर गमतीशीर चित्रांची आणि विनोदांची खैरात पाहायला मिळते; अन आमची जनताही त्यावर मनसोक्त हसून स्वतःचे मनोरंजन करून घेते! कौटुंबिक संवादात ताबा सुटला की नाती बिघडतात, आंदोलनात मर्यादा ओलांडली की मुद्दा हरवतो आणि सामान्य माणसाने बोलताना कायदेशीर काळजी घेतली नाही तर नाहक मनस्ताप सहन करावा लागतो! म्हणूनच, संविधानाला अभिप्रेत असणारा संयम, नीतिमत्ता आणि सामाजिक सलोखा जपूनच आपले विचार मांडायला हवेत. काम कोणतेही असो, समोरच्याचे मन जपून संवादाला जरा साखरेचे पाणी पाजा आणि भाषेची गाडी नेहमी सुरक्षित मार्गाने चालवा!





























