पुण्यात रंगला सांस्कृतिक संगम! ११ व्या राष्ट्रीय ‘कला उत्सव २०२५’ चा दिमाखात शुभारंभ

पुणे : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग व ‘एनसीईआरटी’ (NCERT) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ व्या राष्ट्रीय ‘कला उत्सव २०२५’ चे पुण्यात शनिवारी दिमाखात उद्घाटन झाले. येथील ‘यशदा’ (YASHADA) संस्थेत आयोजित या सोहळ्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचे कौतुक करत त्यांना ‘विकसित भारत २०४७’ चे शिल्पकार होण्याचे आवाहन केले.
कलेतून राष्ट्रनिर्मितीचा संदेश उद्घाटनपर भाषणात श्री. पाटील म्हणाले की, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे शिक्षणात कलेचा अविभाज्य भाग समाविष्ट झाला आहे. विद्यार्थी हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहिमेचे खरे दूत आहेत. कलेला तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करू शकतो.” यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा विशेष उल्लेख केला.
बालगंधर्व रंगमंदिराची संधी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्राचे शिक्षण सचिव रणजित सिंह देओल यांनी मोठी घोषणा केली. या उत्सवात विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यातील ऐतिहासिक ‘बालगंधर्व रंगमंदिर’ येथे आपली कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. ‘एनसीईआरटी’चे संचालक प्रा. दिनेश प्रसाद सकलानी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कला उत्सव हा भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्याचे नमूद केले.
देशभरातून १,००० कलाकारांचा सहभाग २० ते २३ डिसेंबर या काळात चालणाऱ्या या महोत्सवात देशातील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि एकलव्य मॉडेल स्कूलमधील १,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यात शास्त्रीय गायन, वादन, नृत्य, नाट्य, स्थानिक हस्तकला आणि पारंपरिक कथाकथन अशा विविध प्रकारांत चुरस पाहायला मिळणार आहे.
उद्घाटन सोहळ्याची सांगता चिंचवड येथील प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गौरवगाथेने झाली. याप्रसंगी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, डॉ. ज्योत्स्ना तिवारी, राहुल रेखावार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


























