बलिदानाची गाथा अन् राष्ट्रभक्तीची शिदोरी; इचलकरंजी महानगरपालिकेचा ‘हिंद-दी-चादर’ उपक्रम म्हणजे संस्कारांची ही नवी पहाट!


बलिदानाची गाथा अन् राष्ट्रभक्तीची शिदोरी; इचलकरंजी महानगरपालिकेचा ‘हिंद-दी-चादर’ उपक्रम म्हणजे संस्कारांची ही नवी पहाट!

 

इचलकरंजी  : ज्यांच्या बलिदानाने या देशाचा स्वाभिमान आणि धर्म टिकून राहिला, त्या ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी दिनाचे औचित्य साधून इचलकरंजीच्या शैक्षणिक पटलावर सध्या राष्ट्रप्रेमाचे नवे चैतन्य ओसंडून वाहत आहे! महाराष्ट्र शासनाचा आदेश आणि महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचे खंबीर नेतृत्व… यातून शहरात जो उपक्रम उभा राहिला आहे, तो पाहता असे म्हणावे लागेल की—“इतिहास केवळ पुस्तकात वाचायचा नसतो, तो रक्तात भिनवायचा असतो!”

अधिकारी उतरले मैदानात, नियोजनाचा ‘खणखणाट’!
केवळ कागदी घोडे नाचवणारे प्रशासन इचलकरंजीला माहीत नाही. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त विद्या कदम, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार आणि प्रशासनाधिकारी इरफान पटेल या चौकडीने या उपक्रमाचे असे काही नेटके नियोजन केले आहे की, प्रत्येक शाळेचा कोपरा न कोपरा गुरुजींच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात केवळ सण-उत्सव नाही, तर त्याग, सहिष्णुता आणि धार्मिक ऐक्याचे बीजारोपण व्हावे, हाच यामागचा शुद्ध हेतू आहे.

प्रभातफेरीने वेधले अवघ्या नगरीचे लक्ष

शुक्रवारी गुरु तेग बहाद्दरांच्या जीवनावरील माहितीपटाने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर इतिहासाचे सोनेरी पान उघडले गेले, तर आज शनिवारी सकाळी इचलकरंजीच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांच्या रूपाने जणू राष्ट्रभक्तीचा पूरच लोटला होता! हातात घोषवाक्ये, ओठावर गुरुजींच्या शौर्याची गाणी आणि डोळ्यात अभिमान अशा थाटात निघालेली ही प्रभातफेरी पाहताना शहरवासीयांचे ऊर अभिमानाने भरून आले.

“हा केवळ सरकारी कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर राष्ट्रभक्तीचे आणि सामाजिक समरसतेचे संस्कार कोरण्याची ही एक सुवर्णसंधी आहे!” अशा शब्दांत आयुक्त पल्लवी पाटील यांनी शिक्षकवृंदाला साद घातली.

२७ फेब्रुवारीपर्यंत संस्कारांचा जागर!

येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान टप्प्याटप्प्याने चालणार असून त्यात निबंध स्पर्धा, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा आणि चित्रकला स्पर्धांची अक्षरशः रेलचेल असणार आहे. केवळ कोरडी भाषणे देऊन मुले घडत नाहीत, तर त्यांना कृतीतून सांगावे लागते की, गुरु तेग बहाद्दरांनी मानवी मूल्यांसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती कशी दिली.

इचलकरंजी महानगरपालिकेने उचललेले हे पाऊल नक्कीच भूषणावह आहे. ज्या शहरात यंत्रमागांचा खडखडाट ऐकू येतो, तिथे आता राष्ट्रप्रेमाचा सुसंवाद घुमत आहे, हीच या उपक्रमाची मोठी पावती आहे!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!