महाराज ‘थकले’ म्हणणाऱ्या बागेश्वर बाबांचे थोबाड ‘रंगवणार’; संभाजी ब्रिगेडचा ठणकावून इशारा..!
चंद्रशेखर पात्रे
अहो, सध्या ‘चमत्काराचा’ धंदा मांडणाऱ्या काही बुवांना असं वाटायला लागलंय की, कोणाच्याही नशिबाची चिठ्ठी उघडता उघडता ते महाराष्ट्राचा इतिहासही आपल्या मर्जीने लिहू शकतात! ज्या राजाने सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं, ज्यांच्या घोड्यांच्या टापांनी दिल्लीच्या तख्ताला कंप सुटायचा, तो आमचा युगपुरुष म्हणे “युद्ध करून थकला होता”, असा जावईशोध या बागेश्वर बुवांनी लावला आहे. बुवा, तुमची ती ‘दिव्यदृष्टी’ तुमच्या भक्तांसाठी राखून ठेवा, पण शिवरायांच्या इतिहासाच्या आडवा आलात तर महाराष्ट्र तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही!
पिंपरी-चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी या विधानाचा समाचार घेताना शब्दांचे आसूड ओढले आहेत. काळे कडाडले आहेत की, “साडेतीनशे किल्ले जिंकणारा आणि औरंगजेबाच्या उरात धडकी भरवणारा आमचा राजा कधीच थकला नव्हता. अशा महान राजाचा अपमान करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. बागेश्वर बाबांनी जर तात्काळ सार्वजनिक माफी मागितली नाही, तर संभाजी ब्रिगेड त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही.”
या बुवांनी केवळ महाराजांना ‘थकलेलं’ म्हटलं नाही, तर “महाराजांनी आपले राज्य रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केले” असा फुसका बारही सोडून दिला आहे. त्यावर सतीश काळे यांनी बुवांना इतिहासाचा आरसाच दाखवला. महाराजांच्या जीवनात त्यांना घडवणाऱ्या, युद्धकलेचे आणि नीतिमत्तेचे बाळकडू देणाऱ्या एकमेव गुरु म्हणजे ‘राजमाता जिजाऊ’ होत्या. बालपणापासून ज्या माऊलीने शिवबांना रामायण-महाभारतातील वीरांच्या कथा सांगितल्या, तो राजा कुणा उपऱ्या स्वामींच्या चरणी स्वराज्य कसं काय अर्पण करेल? रामदास स्वामी आणि महाराजांच्या भेटीचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसताना, अशा वावड्या उठवून लोकांची दिशाभूल करणे हे आता महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही.
आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांचा धुरळा अजून खाली बसलेला नसतानाच आता या बुवांनी नवीन राडा सुरू केला आहे. पण लक्षात ठेवा, इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे, तो तुमच्या दरबारचा ‘खेळ’ नाही. सतीश काळे यांनी दिलेला हा इशारा केवळ ताकीद नाही, तर तमाम शिवप्रेमींच्या मनात खदखदणारा संताप आहे. आता हे बागेश्वर बाबा आपली ‘थकलेली’ बुद्धी ताळ्यावर आणून माफी मागतात की महाराष्ट्राच्या रोषाला सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!






















