कामगार नेते सुनील शिंदे यांची कोलंबो येथील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड ; असंघटित कामगारांचे प्रश्न आता जागतिक व्यासपीठावर

चंद्रशेखर पात्रे :
पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक आणि राष्ट्रीय मजदूर संघाचे संस्थापक अध्यक्ष, ख्यातनाम कामगार नेते सुनील शिंदे यांची श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. ‘युएनआय ग्लोबल युनियन’ (UNI Global Union) द्वारे आयोजित या परिषदेत शिंदे भारतातील असंघटित कामगारांचे नेतृत्व करणार आहेत.
ही परिषद २७, २८ आणि २९ तारखेला कोलंबो (श्रीलंका) येथे पार पडणार आहे. या परिषदेत भारत, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांतील कामगार प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले असून, भारताच्या वतीने सुनील शिंदे आपल्या कामाची छाप पाडणार आहेत.
या परिषदेमध्ये प्रामुख्याने आरोग्यविषयक विभागात कार्यरत असणाऱ्या असंघटित कामगारांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. विविध देशांमधील कामगारांच्या कायद्यांविषयी सखोल माहिती देणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि असंघटित कामगारांसाठी न्याय्य हक्क, नवीन योजना व धोरणे यावर जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
सुनील शिंदे यांनी आजवर कामगार चळवळीत दिलेले योगदान आणि त्यांचे प्रभावी नेतृत्व लक्षात घेऊनच त्यांची या मानाच्या परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यात ते कामगारांच्या हक्कांचे संरक्षण कसे करता येईल, यावर आपले विचार मांडणार आहेत.
या निवडीबद्दल माहिती देताना सुनील शिंदे यांनी ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांच्याशी संवाद साधला. शिंदे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यामुळे कामगार वर्गात अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध कामगार संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






















